२६ सप्टेंबर २०२४
पुढारी
'द..अदर वर्ल्ड' नाटकाला युरोपमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसाद
राज्यातील कलाकारांचा विदेशात नाटकाद्वारे पृथ्वी, हवामान वाचवण्याचा संदेश
मुंबई : पुढारी वृत्तसेवा पर्यावरणविषयक जनजागृती
आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास वाचविण्याचे आवाहन करण्यासाठी राज्यातील थिएटर ऑफ रेलेव्हन्स हा नाट्य चळवळीतील समूह सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहे. पर्यावरण, पृथ्वी आणि हवामान वाचण्यासाठी थिएटर ऑफ रिलेव्हन्स या नाट्य समुहाची निर्मिती असलेले 'द.. अदर वर्ल्ड' हे इंग्रजी नाटक सध्या युरोपमध्ये प्रस्तुत केले जात आहे.
नाशिक, डोंबिवली नवी मुंबई परिसरातील बाल कलाकारांचा समावेश या नाटकात आहे. जर्मनीच्या किंडर कल्चर करावेन (Kinder Kultur Karawane) तर्फे आयोजित या बालसंस्कृती महोत्सवात हे नाटक सादर केले जाणार आहे. यासाठी हा नाट्यसमूह ७२ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर गेला असून तेथे या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत.
'द.. अदर वर्ल्ड' हे त्यांचे नाटक जर्मनी आणि युरोपमधील कोलोन, हॅम्बर्ग, रोडेफ्जल, वॉफेन, रोडेस्तान, आचेन, लेव्हरकुसेन आदी विविध शहरांमध्ये प्रस्तूत केले जात आहे. या नाटकाचे काही प्रयोग झाले असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले हे नाटक नेत्रा देवाडिगा, प्रांजल गायकवाड, राधिका गाडेकर, तनिष्का लोंढे आणि संजर शिंदे हे बालकलाकार सादर करीत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री व थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांतच्या अभ्यासक अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर आणि कोमल खामकर यांच्या मार्गदर्शनासह, या कलाकारांनी जंगलामध्ये आदिवासींसोबत राहून कमीत कमी, ऊर्जा आणि संसाधनांमध्ये जगून हे नाटक तयार केले आहे!
नाशिक, डोंबिवली, पनवेलच्या मुली
प्रांजल गायकवाड ही नाशिकमध्ये राहत असून दहावीत शिकत आहे. राधिका गाडेकर पिंपळगाव (नाशिक) येथील रहिवासी असून नववीत शिकत आहे. नेत्रा देवाडिगा डोंबिवलीतील असून आठवीत शिकत आहे. तनिष्का लोंढे पनवेल येथे राहत असून १०वीत शिकत आहे. संजर शिंदे चंद्रपूरचा रहिवासी आहे.

No comments:
Post a Comment