Pages

Sunday, September 19, 2021

रंगकर्मी घडताना …रंगभूमी घडवताना!! भाग - २

दिनांक - १९ सप्टेंबर २०२१
आपलं महानगर 

नाटक म्हणजे मानवीय भावनांना, विचारांना आणि त्यांच्या उद्देशाला अभिव्यक्त करणे. नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर प्रस्तुत होते तेवढेच नसते. नाटक हे कलाकाराच्या आणि प्रेक्षकांच्या मनात प्रस्तुत होणारे आयुष्य असते. नाटक हे अभिव्यक्तीचे सर्वात जुने आणि प्रभावी माध्यम आहे. नाटक हे केवळ मनोरंजनापुरते सीमित नसून समाज परिवर्तनाचे ताकदीचे साधन आहे. नाटकाने मला माझ्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तनाची ठोस दिशा दिली.



अरे वा! नाटकात काम करतेस. पण income साठी काय करतेस? नाटकाने पोट नाही ना भरत. नाटक ठीक आहे, पण अजून काय करतेस? असे असंख्य प्रश्न मला एक रंगकर्मी म्हणून अनेकदा विचारले जातात. सुरवातीला या प्रश्नांनी रंगभूमीविषयी शंका उपस्थित होत होती. पण हळूहळू कळायला लागले की हे केवळ प्रश्न नाहीत तर समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. अशी मानसिकता जी नाटकाला उत्प्रेरित करत नाही तर नाटकाची अधोगती करते. ही मानसिकता माझ्यातही होती. नाटकात अभिनय करणे हे सिरीयल किंवा सिनेमा याचे प्रवेशद्वार आहे अशी सर्वसामान्य समजूत प्रचलित असते.

अभिनय हे मुलींसाठी योग्य माध्यम नाही. किंवा नाटक एक छंद किंवा हौशीसाठी ठीक आहे. पण व्यावहारिक आयुष्यात नाटक काही बसत नाही. अशा अनेक वाक्यांमध्ये नाटकाचे क्षेत्र अडकलेले दिसते. जगातील रंगकर्मी सामाजिक जाणिवेने विविध विषय घेऊन रंगमंचावर येतात. पण समाजात असलेल्या या मानसिकतेवर प्रहार करून रंगभूमीला घडवतात का? समाजात चांगली नोकरी, लग्न, भरभक्कम पॅकेज, मोठे घर, आलिशान गाडी हे सुखी होण्याचे मापदंड मानले जातात, पण माणूस म्हणून जगण्यासाठी, चेतना संपन्न होण्यासाठी काय करतात? केवळ पोट भरणे, संसाराचे संसाधन भोगणे एवढेच जीवन नाही. असा विचार कलाकार म्हणून माझ्या मनात येतो.


नाटक म्हणजे मानवीय भावनांना, विचारांना आणि त्यांच्या उद्देशाला अभिव्यक्त करणे. नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर प्रस्तुत होते तेवढेच नसते. नाटक हे कलाकाराच्या आणि प्रेक्षकांच्या मनात प्रस्तुत होणारे आयुष्य असते. नाटक हे अभिव्यक्तीचे सर्वात जुने आणि प्रभावी माध्यम आहे. नाटक हे केवळ मनोरंजनापुरते सीमित नसून समाज परिवर्तनाचे ताकदीचे साधन आहे. नाटकाने मला माझ्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तनाची ठोस दिशा दिली.

मी एक कलाकार म्हणून स्वतःला पाहायला लागले त्यावेळी नाटकापासूनच सुरवात केली. रंगमंचावर पडणारे पहिले पाऊल, होणारी धडधड, प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष अभिनय असा रोमांचक अनुभव माझ्या आयुष्यात नाटकाला एका अद्भुत पातळीवर घेऊन जातो. आपल्याला या ‘स्व’ची जाणीव होते त्यावेळी व्यक्ती एका वेगळ्या विश्वात तरंगीत होत असते, स्पंदित होत असतो. एक कलाकार आपल्या कलेतून या ‘स्व’च्या अधिक जवळ जातो. तो आपल्या कलेने या विश्वाला उर्जित आणि स्पंदित करत असतो. पण हे ऊर्जा तरंग व्यावहारिक जगात टिकतात का? कलाकार म्हणजे उन्मुक्तता. कोणत्याही साच्यात, कोणत्याही चौकटीत किंवा कोणत्याही सीमेत न अडकणारा म्हणजे कलाकार. असाच कलाकार समाजाला, देशाला आणि या विश्वाला नवं जीवन देऊ शकतो.



नवा मार्ग आणि माणुसकीची जाणीव करून देऊ शकतो. पण ही उन्मुक्तता साधण्यासाठी प्रत्येक कलाकाराला स्वतःचे एक तंत्र उभे करणे अत्यंत आवश्यक असते. मुळात असे स्वतःचे तंत्र उभे करण्याची जाणीवच कलाकाराला नसते. चार दिवसांची प्रसिद्धी आणि पोट भरण्यासाठी पैसे कमावण्याच्या नादात त्या ‘स्व’ला इतके आकसून घेतलेलं असते की स्वतःवर होणारा अन्याय, शोषण नजरेतही येत नाही आणि स्वतःच्या तत्वांना नजरेआड करतो. काम मिळवण्यासाठी सगळे सहन करावेच लागणार असे अघोषित अन्यायकारक विधान नव्या पिढीत पसरवले जाते. अन्याय सहन करण्याची मानसिक तयारी केली जाते आणि त्यामुळे कलाकार कलेच्या चेतनेपेक्षा स्वतःच्या न्यूनगंडाने ग्रस्त होतो. वैचारिक पृष्ठभूमी, देश, राज्य, राजनीती, समाज या सगळ्यांची जबाबदारी आणि जाणिवेपासून कलाकार पळू शकत नाही.

एक कलाकार म्हणून माझे ध्येय, माझं अस्तित्व हे माझ्या विचारांवर अवलंबून असते. माझे विचार आणि तत्व यांची अभिव्यक्ती मी कलेच्या माध्यमातून करते. ही वैचारिकता किंवा तात्विकता निसर्गनितीनुसार आहे का? हे पाहणे, समजणे इथून कलाकाराच्या तंत्राची सुरूवात होते. निसर्ग जसा सर्वसमावेशक आहे तसे कलाकार आणि त्याची कला असते. प्रेक्षक हे त्याच्या तंत्राचा महत्वाचा भाग आहेत. कलाकाराला आपल्या तत्वांवर जगण्यासाठी प्रेक्षकांच्या तत्वांना जागवून एक कलातंत्र उभे करावे लागते. कलाकार एक व्यक्ती म्हणून केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर त्याच्या आजूबाजूला वावरणार्‍या व्यक्तींमध्येही जगण्याची मूल्यं जागवतो त्यावेळी खर्‍या अर्थाने स्व-तंत्र या शब्दाच्या जाणिवेला जागतो.

इंप्रेस करणे किंवा प्रभाव पाडणे हा गुण कोणाकडेही असू शकतो. प्रभावित करणे इतपर्यंतच कलाकार मर्यादित नसतो. प्रभावित करणार्‍या पण विध्वंसक व्यक्तींची उदाहरणे विश्वात आहेतच. मात्र विध्वंसाच्या काळात, या महामारीच्या संकटात समाजाला आशेचा किरण दाखवणारा हा कलाकार असतो. कलाकार म्हणून घट्ट उभं राहताना मला एक जमीन लागते. उंच भरारीसाठी आकाश लागते. माणुसकीचे सृजन होण्यासाठी माणसाचा स्पर्श लागतो. ही जमीन, हे आकाश आणि या माणुसकीचे तंत्र कलाकाराला निर्माण करावे लागते. यावरच त्याचे अस्तित्व बहरत जाते.

आज समाजापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. निर्बंधांच्या जाळ्यात अडकलेला प्रत्येकाचा प्राण कधी मोकळा श्वास घेणार? सत्ता नेमके काय करते? एक कलाकार म्हणून असे प्रश्न आपल्या कलेतून मांडणार की केवळ रसिकांचे मनोरंजन करत राहणार? कारण स्वतंत्रता ही जबाबदारी आणि कर्तव्यासोबत येते. कोणतेही तंत्र हे स्थायी नसते. ते तसे नसावेच. कोणतेही तंत्र किंवा व्यवस्था कालांतराने जड होत जाते, रटाळ होते. तंत्र सतत evolve होत राहणे आवश्यक आहे.

कलेची एक स्वतंत्र सत्ता असते. सत्तेची विविध स्वरूपे आपल्यासमोर असतात. जसे की राजसत्ता, सामाजिक सत्ता, आर्थिक सत्ता, सांस्कृतिक सत्ता, धार्मिक सत्ता. या प्रत्येक सत्तेत जनतेला वेठीस धरले जाते. या पाच सत्तेपासून मुक्त असलेला कलाकार उन्मुक्त असतो. कलाकार या प्रत्येक सत्तेला आरसा दाखवणारा असतो. समाजातील कुरीतीच्या विरोधात उभा राहणार असतो. कलेची या सगळ्यांपासून वेगळी स्वायत्त सत्ता असते. ज्यात प्रेक्षकाला विचारांनी पेटवून उन्मुक्तता प्रदान केली जाते. नाटक म्हणजे उन्मुक्त मानवदर्शन. कलाकारांमध्ये जग निर्माण करण्याची ताकद असते. दुसर्‍या कोणत्याही सत्तेखाली कलाकार मिंध्ये होऊन जातात. प्रत्येक कलाकाराने स्व-निर्मित सत्तेची सूत्र हातात घेऊन स्वतःची, रंगभूमीची आणि विश्वाची चेतना जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे. या चेतनेमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

रंगभूमी म्हणजे केवळ 10 ते 5 नोकरी करणे नव्हे. तर 24 x 7 कलाकार म्हणून जगणे महत्वाचे आहे. माझे घर, समाज, देश, विश्वामध्ये घडणार्‍या घटनांनी माझ्यावर होणारा प्रभाव याची जाणीव ठेवणे आणि त्यावर मंथन करणे कलाकाराला घडवतात. नाट्य अभ्यास समग्र आयमांनी असावा. मग तो शारीरिक असो, मानसिक असो, भावनिक असो किंवा आध्यात्मिक. इथे आध्यात्मिक म्हणजे स्व-अध्ययन हा अर्थ आहे. रंगभूमी करियरच्या पलीकडे असलेले आयुष्य उलगडण्याचे माध्यम आहे. नाटक, रंगभूमी म्हणजे प्रचंड ऊर्जा, विचारांची ताकद जी तरुणवर्गाला आकर्षित करते पण त्याला सातत्याने दिशा देण्याची गरज असते.

संपूर्ण एक दशक मी थिएटर ऑफ रेलेवन्स या सिद्धांतांतर्गत या तंत्राला निर्माण करण्याच्या प्रक्रियेला अनुभवत आहे. सर्वात पहिले कलाकार म्हणून एक वैचारिक प्रगल्भता निर्माण करणे, तत्वांवर आधारित नाटक आणि नाटकाला अनुभवणारे सुजाण प्रेक्षक निर्माण करणे. आम्ही कोणत्याही सत्तेच्या तंत्राला, दबावाला न जुमानता प्रेक्षकांचा आवाज बनून गुंजायमान होणारी रंगभूमी सृजित करत आहोत. समाजात नाटकाची नव्याने दृष्टी रोपित करणे अत्यंत आवश्यक आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स हा सिद्धांत 29 वर्षं नाटकातील विविध आयाम उलगडून प्रेक्षकांसमोर मांडत आहे. स्वतः घडत असताना या रंगभूमीला घडवणे हे विश्वातील प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे.





Reference:- 
https://www.mymahanagar.com/featured/saransh/while-learn-the-acting-in-a-play-creating-the-theater/340893/?fbclid=IwAR3kF0bFHeFZK_Jyq8pezx9I2Yj8gWKCB4eytdHJS6E8SwRs_xto65e1cOM

Saturday, September 4, 2021

रंगकर्मी घडताना …रंगभूमी घडवताना !! भाग - 1

दिनांक - ५ सप्टेंबर २०२१
आपलं महानगर 

थिएटर ऑफ रेलेवन्स या प्रक्रियेत आमच्यासाठी प्रेक्षक सर्वात पहिला रंगकर्मी आहे. प्रत्येक प्रेक्षकाला नाटक बघताना हा माझा विषय आहे. माझ्या प्रश्नांविषयी नाटक भाष्य करते आहे. याची जाणीव होते. आणि आपल्याकडे विषयाला जाणून नाटक बघायला येणारे प्रेक्षक संस्कार आहेत. या प्रक्रियेत फेमस चेहरा पाहण्यापेक्षा संकल्पनेला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मी अनुभवले आहे. या सिद्धांतांतर्गत आम्ही कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद करून अशा प्रेक्षकांना रंगभूमीशी आणि नाटकाशी जोडले आहे ज्यांनी आयुष्यात नाटक कधी पाहिलेच नव्हते.


रंगभूमी! विविध रंगांनी सजलेली रंगभूमी. रंग म्हणजे विचार आणि विचारांचे कर्म करणारी माझी रंगभूमी. प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी म्हणजे त्याची जन्मभूमी. जिथे तो कलाकार म्हणून निर्माण होतो, जगतो. या रंगभूमीने असंख्य कलाकार घडवले आणि या विश्वाला पुरस्कृत केले. जसं आई आपल्या बाळाला घडवत जाते.त्यानंतर एक वेळ अशी येते की मूल आपल्या आईला जननी म्हणून घडवते. तसेच एक कलाकार म्हणून रंगभूमीला समृद्ध करणे आणि घडवणे हा कलाकाराच्या सृजनप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे.


मी रंगभूमीवर अभिनय करायला सुरुवात केली त्यावेळी अभिनयाचे ध्येय माझ्याकडे नव्हते. रंगभूमीचे आणि माझे नाते दृढ करण्याचा संकल्प नव्हता. रंगभूमीचा स्पर्श आणि माझा स्पर्श मला काय सांगतो याची जाणीव नव्हती. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाट्यसिद्धांताच्या प्रक्रियेत मी कलेला आणि कलाकाराला नवीन दृष्टीने पाहू लागले. कला जी माणसाला माणूस म्हणून बनवते. कलाकार जो काळाला आकार देतो. ही नवीन दृष्टी मला एक व्यक्ती आणि एक कलाकार म्हणून अंतर्बाह्य सकारात्मक परिवर्तनासाठी प्रेरित करणारी ठरली. मुळात रंगभूमी माझी आणि मी रंगभूमीची ही संकल्पना जगण्याची सुरवात झाली.



कला म्हणजे केवळ मनोरंजन या सर्वात मोठ्या भ्रमाला एक कलाकार म्हणून मी ब्रेक केलेच त्यासोबत प्रेक्षकांच्या याच साच्यात बसवणार्‍या मानसिकतेलाही तोडले. समाजाचा आरसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नाला वाचा फोडणारी, परिस्थितीला विश्लेषित करून तिला उलगडून जगण्याचा मार्ग दाखवणारी रंगभूमीची खरी ओळख थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यसिद्धांताच्या प्रक्रियेत मला जाणवली.

‘वैचारिक नाटक चालत नाही, केवळ विनोदी नाटक पाहायला प्रेक्षक येतो’ असे रंगभूमीला नष्ट करणारे भ्रम कोण पसरवतात? विचार करण्यास प्रेरित करणारी नाटके प्रतिबद्धतेने आम्ही करत आलो आहोत आणि अशी नाटकं पाहण्यासाठी प्रेक्षकवर्गही तयार केला आहे. मुळात नाटक म्हणजे विचार या तत्वाला समजून सृजना केली तर सृजनशील प्रेक्षक निर्माण होतात जे समाजाच्या उन्नतीसाठी आधार बनतात.

छेडछाड क्यों? ते लोकशास्त्र सावित्री या नाटकापर्यंतच्या प्रवासात असंख्य प्रेक्षक आम्हाला भेटले ज्यांनी या विवेकवादी, वैचारिक नाटकांचे मनःपूर्वक स्वागत केले. नाटकाला केवळ गल्लाभरू मानसिकतेने पाहून, कलेचा व्यापार करून, पोट भरण्यापुरता रंगभूमीला मर्यादित ठेवून रंगभूमी घडत नाही. रंगभूमीच्या मातीत प्रत्येक कलाकार अंकुरित होऊन वटवृक्ष बनतात. प्रेक्षक आपल्या आयुष्याचा तप्त उन्हात चालताना या वटवृक्षाच्या सावलीत शांत होतात. हे सावली बनण्याचे तत्व रंगभूमीला समृद्ध करते.

नाटकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची संकल्पना, विषय. ज्या ताकदीने, दृष्टीने विषय मांडला जातो प्रेक्षकांच्या मनात निरंतर प्रस्फुटित होत राहतो. नाटक म्हणजे केवळ ‘प्रसिद्ध चेहरा’ नाही. सिनेमा सिरीयलमधील कलाकार टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्याविषयी असलेले आकर्षण हे नाटकाचे केंद्रबिंदू ठरणे हे रंगभूमी आणि आपल्या सुजाण प्रेक्षकांविरुद्ध निर्माण केलेले जाळे आहे.


थिएटर ऑफ रेलेवन्स या प्रक्रियेत आमच्यासाठी प्रेक्षक सर्वात पहिला रंगकर्मी आहे. प्रत्येक प्रेक्षकाला नाटक बघताना हा माझा विषय आहे. माझ्या प्रश्नांविषयी नाटक भाष्य करते आहे. याची जाणीव होते. आणि आपल्याकडे विषयाला जाणून नाटक बघायला येणारे प्रेक्षक संस्कार आहेत. या प्रक्रियेत फेमस चेहरा पाहण्यापेक्षा संकल्पनेला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मी अनुभवले आहे. या सिद्धांतांतर्गत आम्ही कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद करून अशा प्रेक्षकांना रंगभूमीशी आणि नाटकाशी जोडले आहे ज्यांनी आयुष्यात नाटक कधी पाहिलेच नव्हते.


रंगभूमी, कलाकार आणि प्रेक्षक यांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे लेखक. आमच्यासाठी पहिले लेखक मग दिग्दर्शक त्यानंतर अभिनेता किंवा अभिनेत्री यांचा नंबर लागतो. दिग्दर्शक हा शब्द आपल्याला दिशा दर्शवणारा म्हणजे संहितेची दिशा दर्शवणारा असाच अर्थ सांगतो. आज रंगभूमीवर लेखकाला प्राधान्य किती दिले जाते हे प्रश्नचिन्ह आहे? लेखकाची संकल्पना साकारत रंगभूमीवर नाटक आकार घेते. विवेकवादी लेखक आणि त्याचे लेखन चालत नाही हेही भ्रम पसरवणारे नेमके कोण?


नक्कीच आपण म्हणतो की काही अपवाद असतात. अपवादात्मक वैचारिक नाटकं चालतात. पण मी मुख्यधारेविषयी बोलतेय. विचारांना अपवादात्मक बघणे म्हणजे आपल्या आयुष्याला एका साचेबद्ध चौकटीत पाहणे. एक कलाकार म्हणून नाटकाच्या समग्र आयमांना आम्ही समजत आहोत. अभिनयासोबत लिखाण, वाचन, चर्चा, संवाद आणि शोध. हे सगळे आयाम आम्हाला रंगभूमीला समजून घेण्यास प्रेरित करतात.


कलाकाराचे frustration किंवा कला एक प्रॉडक्ट आणि कलाकार फॅक्टरीचा वर्कर या बंधनातून मुक्त करण्यासाठी आम्ही रंगभूमीवर अनहद नाद unheard sounds of universe या नाटकाचे मंचन केले. एक ते दीड वर्ष स्वतःची कलात्मक अवधारणा, अभिनय, नाटक, रंगमंच यांचा नव्याने अभ्यास केला. आज किती नफा आणि माझा काय फायदा याच्या पलीकडे नजर जात नाही. रंगभूमीवरील काही नाटकांची नावे ही संकल्पना आधारित येतात का हा प्रश्न आहे? थिएटर ऑफ रेलेवन्स प्रस्तुत अनहद नाद या नाटकातून कला आणि कलाकाराला खरेदी विक्रीच्या जाळ्यातून उन्मुक्त करण्याचा पुढाकार आम्ही घेतला. आणि हेच अंतिम सत्य आहे असेही नाही. कारण कलाकार म्हणजे सतत शोध. आमचा निरंतर शोध सुरू आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स अनुसार दोन तत्व महत्त्वाची-एक कलाकार आणि दुसरा प्रेक्षक. कलाकार आम्ही आहोत आणि प्रेक्षकांसाठी आम्ही थेट कोणत्याही बाजारू माध्यमाचा वापर न करता प्रेक्षकांशी संवाद साधला. कलेचे, रंगमंचाचे मूळ ध्येय काय आहे? यावर चर्चा करून प्रेक्षकांमध्ये रुजवलेल्या बाजाराने उभं केलेल्या एंटरटेनमेंटला खोडायचं होतं. कला आणि रंगमंचाचे ध्येय जाणणारे प्रेक्षक घडवायचे होते.


बर्‍याच वेळा मी ऐकत आले की वैचारिक म्हणजे प्रायोगिक नाटक, व्यावहारिक गणितं म्हणजे ते कमर्शियल नाटक. मुळात नाटक हे नाटक असतं. सगळ्या नाटकांना आर्थिक बाजू असते. प्रत्येक नाटक सामाजिक संदेश घेऊनच येते. त्यात प्रायोगिक किंवा व्यावसायिक किंवा सामाजिक प्रबोधन करणारे असे वेगवेगळे साचे का असावेत? अशा साच्यांमध्ये नाटकाला बसवून नाटकाचे मूळ ध्येय हरवते. नाटकाचे मूळ ध्येय माणुसकीला जागवणे, संविधान संमत समाज निर्माण करणे हे असावे. कलाकार जिथे उभा राहतो तिथे रंगमंच निर्माण करतो. त्यामुळे कलाकार म्हणून आम्ही नेपथ्य, lights, संगीत, वेशभूषा यात न अडकता अभिनय आणि विचारांनी रंगभूमीवर कल्पनाशक्तीने रंगविश्व उभारले.


नाटक पाहताना आलेल्या अनुभूतीला लगेच प्रकट करणारे प्रेक्षक या नाटकाच्या समग्रतेचे दृष्टिकोन उघडतात ही खरी समीक्षा. मुळात समीक्षण म्हणजे गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणे. नाटकाला या मूल्यमापनाच्या पलीकडे नेणे जास्त जरुरी आहे. नाटक या सार्‍याच्या पलीकडे आहे आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाटकाला या मूल्यमापनाच्या पलीकडे पोहोचवते आणि व्यक्तीच्या अनुभवांच्या सीमा तोडून एक समज निर्माण करते. या प्रक्रियेत प्रत्येक नाट्यप्रस्तुती नंतर प्रेक्षकांना रंगमंचावर बोलावण्यात येते आणि विषयांशी संबंधित विचार प्रक्रिया संवादाच्या माध्यमातून होते. याने प्रेक्षक आणि कलाकार यांतील दरी संपुष्टात येऊन एक अनन्य साधारण नाते निर्माण होते. प्रेक्षक केवळ टाळ्या वाजवून निघून न जाता, थिएटर ऑफ रेलेवन्सच्या तत्वानुसार रंगकर्मी होऊन जातात आणि प्रक्रिया पुढे नेण्यास सहाय्यक ठरतात. एक व्यक्ती म्हणून, समाजातील एक घटक म्हणून प्रत्येक प्रेक्षक एक भूमिका निभावत आहेत. थिएटर ऑफ़ रेलेवन्सने प्रेक्षकांना नाटक पाहण्याची तात्विक दृष्टी दिली, की तुम्ही केवळ टाळ्या वाजवून निघून जाऊ नका तर रंगमंचावर येऊन नाटकाद्वारे अनुभवलेले स्पंदन, ऊर्जा संवाद साधून आपण पुन्हा एकत्र जगुया आणि या विश्वाला स्पंदीत करूया.


– अश्विनी नांदेडकर

REFERENCE:-https://www.mymahanagar.com/featured/saransh/theater-and-artists/336479/?fbclid=IwAR1eFnvBPissFegSXSy-YaWGTTPTxN9V4PYSNV5SbDqcz2sqya_LA-f_neE