Pages

Sunday, May 12, 2019

चौकटी बाहेरचे सृजन


आपलं महानगर 

दिनांक - १२ मे  २०१९



आमचा हा दृढ विश्वास आहे की, परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता कलाकारांमध्ये असते. म्हणून आम्ही कलाकारांनी विद्रोह केला आणि नाटकाची ठरलेली चौकट मोडली, ज्यात पारंपरिक कोणत्याही गोष्टी नाहीत, उलटथिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांताअंतर्गत कलात्मक प्रस्तुतींच्या माध्यमातून, नाटकाचे चिंतन प्रेक्षकांच्या मनात रुजवले आणि प्रेक्षकांना व्यक्त होण्याचा मंच प्रदान केला.

आपली मराठी रंगभूमी संपूर्ण भारतात नावाजली जाते. मराठी रंगभूमीवर एक नाट्य परंपरा आहे आणि तिला दर्शक संस्कार आहेत असेही म्हटले जाते. हौशी पातळीवरच्या राज्य नाट्य स्पर्धांतून रंगभूमीवर नवीन रंगकर्मी पदार्पण करतात.

या रंगकर्मींचा आपल्या मराठी रंगभूमीवरील नाट्य परंपरेनुसार प्रवास असा आहे की, आधी कॉलेजमधून एकांकिका करणे आणि मग हौशी नाटकांतून, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, त्यानंतर तिथून व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचे मग मालिका आणि मालिकांनंतर चित्रपट.इथे एक बाजू अशी दिसते की, हे कलाकार परंपरा पाळतात, परंपरेला जिवंत ठेवतात; पण ते कलात्मक सृजन करतात का? आपण असे समजूया की एकंदरीत 10 हौशी स्पर्धात्मक नाटकं वर्षभरात होतात. या 10 नाटकात 100 कलाकार काम करतात असं समजून चालूया, यातील 50 राज्य नाट्य व्यावसायिक नाटकात दिसतात, पाच मालिकांतून पुढे येतात आणि एखाद्यालाच चित्रपट मिळतो. रंगभूमी कलाकार घडवते मग बाकी 45 जातात कुठे? त्यांची जबाबदारी कोण घेतंम्हणजे परंपरा कायम ठेवण्यासाठी 45 कलाकारांचा बळी जातो असे नाही का वाटत ….मराठी नाटक हे केवळ परंपरा चालविण्यासाठी आहे का? आणि जर समृद्ध परंपरा आहे तर, आपली रंगभूमी सृजन का करीत नाही.

अशावेळी आपली मराठी रंगभूमी पुरोगामी प्रयोगशीलतेसाठी प्रतिबद्ध आहे का? हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. परंपरा म्हणजे पूर्वनिर्धारीत मार्ग, जो रटाळ असतो, ज्याच्यात नावीन्य नसते, innovation नसते, शोध नसतो, परंपरा समाज आणि कलेला संपवते. जो सतत नवीन सृजन करतो तोच कलेमध्ये टिकतो. म्हणजे शैली किंवा परंपरा पाळण्याऐवजी नवीन सृजन करणे आपल्या कलाकारांची आणि रंगभूमीची गरज आहे आणि ती गरज कलाकारांची योग्यता विकसित करून त्यांना उन्मुक करते, तेव्हा कलाकार नवीन सृजन करतात. जसे पारंपरिक नाट्य शैलीत शिकवले जाते, ठसवले जाते की 1 अधिक 1 म्हणजे 2, म्हणजे ज्याचे उत्तर या ठरलेल्या ढाच्यात फिट बसेल तो सर्वश्रेष्ठ. पण मुळात जीवन 1 अधिक 1 असे नसतेच, आयुष्याची आव्हाने वेगळी असतात आणि तिथे हा ठरलेला ढाचा योग्य उत्तर देईलच असं नाही. प्रत्येकाची आव्हाने वेगळी, संघर्ष वेगळा, मार्ग वेगळा आणि समाधानही वेगळे. उत्तर काही येवो पण त्याचे बौध्दिक विश्लेषण करणे आवश्यक आहे. जीवनातील अनुभवातून कला निर्माण होते. जीवन जगताना आलेले अनुभव, प्रसंग, घटना, शिकवण या नाटकांतून थेट भिडणार्‍या असाव्यात. आपल्या रंगभूमीसाठी कार्य करत असताना आमचं हे मूल्य असतं, की मनोरंजन हा नाटकाचा एक भाग असावाच, पण त्याचे प्रमाण मात्र जेवणातील मिठाएवढे असावे, बाकी संपूर्ण आहार हा पौष्टीक असावा. नाटकाच्या माध्यमातून मेंदूचे बौद्धिक पोषण करण्यासाठी आम्ही कलाकार प्रतिबद्ध आहोत.

मराठी रंगभूमीने आता पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन बदलाना स्वीकारण्याची सुरुवात केली आहे. थिएटरची दुरवस्था आणि नव्या सजग नाटकांची कमतरता रंगभूमीला नेहमीच जाणवते. त्यात मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत म्हणून आशा पल्लवित होत असतानाच रंगभूमी पुन्हा त्याच मानसिकतेत अडकलेली दिसते. भांडवलदारांनीदेखील कलेची समाजाप्रती काही जबाबदारी आहे, हे संपवलेच. कला म्हणजे फक्त मनोरंजन आणि उपभोगाची वस्तू. कलाकाराला नुसतं या नावावर भ्रमित केले की, “तुम्हाला पैसा आणि प्रसिद्धी मिळेल”. त्यामुळे कलाकार कलेतील तत्वांचा दुरुपयोग करतात. सत्तेला थेट भिडत नाही, जाब विचारत नाही. कारण मुळात सत्ता कलेला घाबरते, सत्तेची जिथे चालत नाही, सत्तेची जिथे पोहोच नाही तिथे कलाकार असतो.आता कलाकारांची ही जबाबदारी आहे की केवळ स्वतः स्थापित होण्यासाठी जागतिकीकरणाच्या षड्यंत्रात अडकून नाटक आणि रंगभूमीचा केवळ उपयोग करण्यापेक्षा, कलेला आणि आपल्या रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी, कलेमध्ये नवीन सृजन करण्यासाठी आत्मशोध करणे अनिवार्य आहे. कारण आत्मशोध आणि कलेचा थेट संबंध आहे. आत्मशोध म्हणजे स्वतःशी connection,आत्म अध्ययन.

तशीच कला आहे, कला म्हणजे स्वतःचे स्वतःशी connection होऊन मग त्याचे सादरीकरण करणे. म्हणजे जीवनाचा सार, एक खोटी घटना घेऊन त्याला पुनः सत्यात जागृत करणे. तर कलाकार होण्यासाठी आत्मशोध किती आवश्यक आहे. पण कला केवळ व्यवहारासाठी असणे म्हणजे अस्तित्व हरवलेली प्रक्रिया. आत्मशोधातून स्वतःची जाणीव निर्माण होते . त्यासाठीचे कौशल्य स्वतःची ओळख, अस्तित्व काय, स्वतःची ऐकण्याची, बोलण्याची क्षमता काय, मेंदू काय, स्वतःचा space सोबत काय संबंध आहे, स्वतःचे आयुष्यातील ध्येय काय? – हे कलाकाराला स्पष्ट होते. कलाकार जेव्हा आत्म (स्वयं) सोबत जोडला जातो तेव्हा त्याला प्रसिद्धी मिळतेच. कारण प्रसिद्धी हे कलेचे अभिन्न अंग आहे.

आमचा हा दृढ विश्वास आहे की, परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता कलाकारांमध्ये असते. म्हणून आम्ही कलाकारांनी विद्रोह केला आणि नाटकाची ठरलेली चौकट मोडली, ज्यात पारंपरिक कोणत्याही गोष्टी नाहीत, उलटथिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांताअंतर्गत कलात्मक प्रस्तुतींच्या माध्यमातून, नाटकाचे चिंतन प्रेक्षकांच्या मनात रुजवले आणि प्रेक्षकांना व्यक्त होण्याचा मंच प्रदान केला. म्हणजे कलाकारांच्या उन्मुक्ततेसोबत प्रेक्षक आणि रंगभूमीलाही उन्मुक्त केले. आमच्या सात्विक कलाकृतीने आपल्या मराठी रंगभूमीवर नवीन मापदंड प्रस्थापित केले जेणे रंगभूमीला मानसिक समाधान प्राप्त झाले. आमचे हे तत्व आहे की, कला निव्वळ कलेसाठी नाही. जिचे जीवनाशी काही घेणेदेणे नाही ती कला कशी असू शकते. कारण कलेचे मुख्य तत्व आहे आयुष्याला व्यवहारिकतेच्या जडत्वापासून मुक्त करणे. कला तीच आहे जी व्यवस्थेचे शुद्धीकरण करते. कला तीच आहे जी सत्तेला भिडते, जी माणसात माणुसकीचा भाव जागवते.

मराठी रंगभूमीचा हा इतिहास आहे की, ती नेहमी सामाजिक आणि राजकीय चळवळींसाठी तत्पर असायची; पण दरम्यानच्या काळात, प्रामुख्याने मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय इतपत मर्यादित झाली आहे. आम्हा रंगकर्मींची ही मनीषा आहे की, आता पारंपरिक मर्यादा ओलांडून सर्वसामान्यांचा आवाज होण्याची अपेक्षा आपल्या मराठी रंगभूमीकडून आहे, आणि पुन्हा नव्याने व्यक्तिगत आणि व्यवस्थागत परिवर्तनासाठी उभं राहण्याची आवश्यकता आहे. ज्याने खर्‍या अर्थाने आपली मराठी रंगभूमी आधुनिक आणि पुरोगामी विचारांचा, जीवनदृष्टींचा विकास करेल आणि विश्वभरात कलात्मक क्रांतीसाठी नावाजली जाईल.

सायली पावसकर रंगकर्मी )



No comments:

Post a Comment