Pages

Friday, October 18, 2019

राजकीय जाणिवांचा नाट्यजागर - तुषार म्हस्के

 मुंबई, शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९ सकाळ 

राजकीय जाणिवांचा नाट्यजागर

यूथटॉक

राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. दोन दिवसांनंतर मतदान होणार आहे. अशावेळी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना आपण मतदार म्हणून सजग असणेही लोकशाहीसाठी गरजेचे आहे. ही जाणीव माझ्यातल्या कलावंताला नाटकाने करून दिली आहे. 



नाटक आणि माझा तसा काहीच संबंध नव्हता. आयुष्यात एक उदासीनता आली होती. अशा स्थितीमध्ये मी 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाट्यसिद्धांताच्या प्रक्रियेशी जोडला गेलो. या नाट्यसिद्धांताने मला रंगमंचावर उभे केले ते तत्त्वाने... एका उद्देशाने ! इथून माझा कलाकार म्हणून जगण्याचा प्रवास सुरू झाला. नाटक व जीवन एकमेकांना पूरक असते, याच दृष्टीने आयुष्यातील एकेक समस्या मी नाटकाच्या माध्यमातून सोडवू लागलो आणि जीवनातील नाटक कमी होऊ लागले. मी आयुष्य खऱ्या अर्थाने जगू लागलो. या नाट्यसिद्धांताने माझ्या परिवारात, समाजात माझी एक नवीन ओळख निर्माण केली. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटक 'राजगति'ने माझ्यातील राजकारणाविषयी असणारे भाव व सुप्तावस्था जागृत केली. 

बदलाची अपेक्षा नेहमी दुसरा कोणीतरी करणार आणि त्यानंतर मी बदल करणार, अशीच माझीही मानसिकता होती. पण, 'राजगति' नाटकामुळे जाणीव झाली, की हा देश माझा आहे आणि नागरिक म्हणून देशासाठी माझी एक भूमिका आहे- माझ्या कलेतून बदल घडवून आणण्याची! मुळात रंगजगतात काम करणारे असे किती कलाकार आहेत, जे मानतात की माझी सामाजिक भूमिका आहे आणि या भूमिकेबरोबर राजकीय समजही आवश्यक आहे. मुख्यत्वे कलाकार हा जनमानसाचा आवाज असतो. मानवी जीवनातील घटित-अघटित प्रश्नांचे तो प्रतिनिधित्व करतो आणि व्यवस्थेला जाब विचारतो. त्यामुळे कलाकाराची दृष्टी काळाला घडवत असते. 'राजगति' नाटकाच्या प्रक्रियेमुळे माझी दृष्टी स्पष्ट झाली, की राजकारणाला शिव्या देण्यात काहीच अर्थ नाही. 

राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी माझी भूमिका काय आहे आणि मला माझी भूमिका कशा पद्धतीने बदलता येईल, निभावता येईल, हे मला समजले. एक कलाकार म्हणून नाटक आणि सामाजिक भूमिका, राजनैतिक परिदृश्य याचा संबंध स्पष्ट होत गेला. राजकारण वाईट नाही, राजकारण ही शुद्ध आणि पवित्र नीती आहे, ही संकल्पना घेऊन 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'ने 'राजनैतिक चिंतन रॅली' आयोजित केली. 

राजकारणात सर्वसामान्य माणसांनी सहभागी व्हावे, त्यासाठी मी राहतो त्या भागात ही रॅली सकाळी ७:३० ते १० च्या दरम्यान काढली. जेथे पैशाविना कुठलीच राजकीय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, तेथे ही रॅली एकही रुपया खर्च न करता आम्ही जनतेच्या सहभागातून काढली. 

महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांनी न्याय, समता आणि समानतेची मूल्ये जनमानसात रुजवत एक उन्मुक्त जीवन जगण्याची चेतना जागृत केली आणि प्रत्येकाला संघर्षाच्या लढ्यात सामील केले, त्याचप्रमाणे आम्ही रंगकर्मी जनमानसात राजनैतिक विवेक जागवण्यासाठी राज्यघटनेतील सर्वसमावेशक धोरण व मूल्ये रुजवत आहोत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात आम्ही लोकशाही व राज्यघटनेच्या रक्षणासाठी जनसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहोत आणि राजकीय परिदृश्य बदलण्यासाठी जनसहभाग आवश्यक आहे, हा विचार सर्वसामान्य जनतेत रुजवत आहोत. देशवासीयांमध्ये राजकीय जाणिवा जागृत करण्याची आज गरज आहे. लोकशाही म्हणजे निवडणुका हरणे आणि जिंकणे एवढेच नाही, हे देशातील प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगण्याची गरज आहे. ही राजकीय जाणीव जागृत करण्यासाठी आम्ही रंगकर्मी 'विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधानसंमत' राजकीय पिढी घडवण्याचा संकल्प करीत आहोत. 

तुषार म्हस्के 

(लेखक मुंबईतील प्रायोगिक रंगभूमीवरील कार्यकर्ते आणि रंगकर्मी आहेत.)

Sunday, July 21, 2019

विश्वाला एकसूत्रात बांधते नाटक

आपलं महानगर
२१  जुलै २०१९
नाटक बघून प्रेक्षकांचे हे म्हणणे होते की ही एक शक्ती आहे जी आमच्या मनापर्यंत पोहोचली ..भारतीय नदी आणि पाण्याविषयी वाचलेल्या पुस्तकांची वास्तविकता अनुभवली.. या नाटकात शेवटी आम्ही प्रेक्षकांना आमच्या सोबत रंगमंचावर सामील करायचो .. आनंदाने आमच्यात मिसळून ते एक व्हायचे.. एक नाटक आमच्यातले बंध जोडत होते.. सगळे भेद दूर होऊन समभाव निर्माण होत होता ...



नाटक
वैश्विक स्वीकार्यतेच्या हुंकारापासून सुरुवात झालेला आमचा कारवा युरोपच्या चार देशात निघाला …युरोपमध्ये एका देशातून दुसर्‍या देशात स्थलांतर .. म्हणजेच एका समृद्धीतून, एका लोक संस्कृतीतून दुसर्‍या समृद्धीत, लोक संस्कृतीत आम्ही प्रवेश करत होतो …भारतातून जर्मनी, जर्मनीतून स्लोव्हेनिया मग तिथून ऑस्ट्रिया, इटली … आणि या प्रवासात आमच्या सोबत होती थिएटर ऑफ रेलेवन्स या तत्वाची प्रकिया जी या प्रवासाला, अनुभवाला आमच्या आत झिरपवत होती..
सहासष्ट दिवसात २९ नाटकांचे प्रयोग आणि २७ कार्यशाळा झाल्या …सुमारे दहा हजार कि.मी.चा प्रवास आणि जवळजवळ 5000 लोकांचा प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग झाला.. विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, सामान्य जनता यांचा सहभाग होता… छोट्या छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत, शाळेपासून मोठ्या थिएटरपर्यंत, व्यक्तीपासून ते समुदायापर्यंत आम्ही या तत्वाचा प्रवास केला आणि लोकांमध्ये चेतना पेटवली.

‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’ या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगानंतर हॅम्बर्ग येथील लोकांमध्ये ती जागृती निर्माण झाली तिथे पाण्याचे खाजगीकरण करण्यासाठी येणार्‍या एका कंपनीविरोधात तेथील जनतेने या नाटकामुळे प्रेरित होऊन आंदोलन केले आणि खाजगीकरणाच्या विरोधात उभे राहिले. कलेला सीमेचे, भाषेचे बंधन नसते … कलेची एकच भाषा ती म्हणजे माणुसकी .. ही आमची कलात्मक प्रतिबद्धता, आत्मसात केलेले तत्व जाणून घेण्यासाठी युरोपियन उत्सुक होते… याची नोंद ते वेळोवेळी घेत होते .. युरोपियन वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही पहिल्या पानावर झळकत होतो .. माणुसकीचे तत्व जपणारी कृती आपल्याकडे भारतात पहिल्या पानावर छापली जात नाही. आपल्याकडे मीडिया व्यक्तीची प्रसिद्धी, तिचे पद बघून जागा देते; पण मला स्वतःविषयी अभिमान वाटत होता की तिथे माझ्यातल्या कलात्मक प्रतिबद्धतेची त्यांनी नोंद घेतली. आमची कलात्मक प्रतिबद्धता आणि भारतीय नाट्यकलेतील व्यापकता त्यांना जाणवली त्याबद्दल त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. जो पुरोगामी म्हणवणार्‍या भारतीय रंगकला जगतात अभावाने आढळतो ..

जर्मनीमधील शाळा अप्रतिम होत्या … त्यांचे वर्ग, हॉल, इनडोअर, आऊटडोअर खेळांची मैदाने, तेथील रंगमंच, lights, जेवणासाठी खास बांधलेले मोठे प्रशस्त हॉल, कॅन्टीन, जेवणासाठी तयार असलेले पौष्टिक पदार्थ …तेथील लहान मुलांची एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली ती म्हणजे जेवण झाल्यावर आपापली ताटे धुण्याच्या ठिकाणी नेणे आणि फडके व पाणी घेऊन टेबल साफ करणे हे ते स्वतः करत होते ..स्वावलंबी बनत होते. लहान मुलांचे शिबीर म्हणजे मोठी जबाबदारी होती .. कारण लहान मुलांना गुंतवून ठेवणे आणि त्यांना सतत नवीन देणे यात कसरत होत होती..त्यात एक लहान मुलगा होता ‘निकितान’ नावाचा .. प्रचंड मस्तीखोर.. एका जागी बसेचना. मंजुल सर म्हणाले, त्याला त्याच्या मर्जीने राहू दे, बळजबरीने शिकवण्यापेक्षा मुलांच्या कलेने घेणे गरजेचे आहे .. त्यांना मोकळीक आणि space देणे जरुरी आहे .. आपण दिलेली मोकळीक आणि space ची जाणीव त्यांना मजबूत करते..


मुलांसाठी शिबीर घेताना मुलांमध्ये झालेल्या परिवर्तनाला बघून तिथल्या शिक्षकांनी त्यांच्या स्वतःसाठी शिबीर घेण्याची इच्छा जाहीर केली ..त्यांचे प्रश्न होते की कठीण विद्यार्थ्याला कसे हाताळावे ? कुठले तंत्र, पद्धती, सूत्र वापरू शकतो ? प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या मानसिकतेचा, वेगळ्या पार्श्वभूमीचा, वेगळ्या विचारांचा असतो आणि आमच्यासाठी तर आम्ही वेगळ्या खंडात होतो हे आव्हान होते.. मंजुल सरांनी एका विद्यार्थिनीला उभे केले आणि शिक्षकांना सांगितले की, “हिला तुमच्या मनासारखा आकार द्या” .. आणि त्या विद्यार्थिनीला सांगितले की, “यांचे अजिबात ऐकू नको” .. शिक्षकांनी त्यांच्या मनासारखे आकार देण्याचे खूप प्रयत्न केले पण जमले नाही .. यावरून हे समजले की विद्यार्थी म्हणजे नुसते दगड किंवा वस्तू नसतात जे केवळ शिक्षकांच्या विचारांनी चालतील.. त्यांना वेगळे व्यक्तिमत्व असते .. त्यांना गृहीत धरणे चुकीचं आहे… आपल्या विचारांशी त्यांच्या विचार प्रवाहाशी जोडून नीतीगत दिशा दाखवणे शिक्षकांचे काम असते .. आदेश देण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी जुळवून घेणे, मनाने नाते जोडणे, विश्वास निर्माण होणे जरुरी आहे .. विद्यार्थ्यांचा हा विश्वास असतो की शिक्षक त्याच्यासाठी नेहमी चांगलाच विचार करतो .. विद्यार्थी वस्तू नसून माणूस आहे ..त्यांच्या स्वतःच्या कल्पनेत उंच भरारी घेण्याची शक्ती त्यांच्यात असते .. ती शक्ती वाढवणे चांगल्या शिक्षकांनाच जमू शकते .. सुरक्षित स्पर्शाची भाषा विद्यार्थ्यांना कळते ..सुरक्षित वातावरणात विद्यार्थी कधी प्रश्नोत्तरे, कधी संवाद-विवाद तर कधी खेळून नवीन प्रयोग करतात … शिक्षकाची भूमिका नेहमी ‘मला’ हे करायचे आहे विद्यार्थ्याला हे दाखवायचे, शिकवायचे आहे, विद्यार्थ्याने असे करावे अशी असते .. पण खरा शिक्षक ‘मला’ हा शब्द न वापरता ‘आपल्याला’ काय शिकायचे आहे या प्रक्रियेला पाहतो.. शिकणे आणि शिकवणे हे दोन्ही बाजूने सुरू असते ..शिक्षकांच्या मानसिकतेला, स्पंदनांना त्यांच्या तणावाला विद्यार्थी अचूक पकडतात.. शिस्तीच्या नावाखाली कधी कधी बुद्धीला बंद केले जाते … इकडे तिकडे बघू नका, बोलू नका, प्रश्न विचारू नका यामुळे त्यांच्या जिज्ञासेला आपण मारतो … शिकणे ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे हे त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे…शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जाऊन ते कसे शिकतात हे पाहणे गरजेचे आहे .. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मुलांच्या सकारात्मक ऊर्जेला दिशा देणे शिक्षकांवर असते..

नाटक बघून प्रेक्षकांचे हे म्हणणे होते की ही एक शक्ती आहे जी आमच्या मनापर्यंत पोहोचली ..भारतीय नदी आणि पाण्याविषयी वाचलेल्या पुस्तकांची वास्तविकता अनुभवली.. या नाटकात शेवटी आम्ही प्रेक्षकांना आमच्या सोबत रंगमंचावर सामील करायचो .. आनंदाने आमच्यात मिसळून ते एक व्हायचे.. एक नाटक आमच्यातले बंध जोडत होते.. सगळे भेद दूर होऊन समभाव निर्माण होत होता …

प्रत्येक प्रक्रिया तत्वाने सुरू होते मग प्रयोग असो किंवा कार्यशाळा.. त्या तत्वाला ध्येयाची जोड असणे महत्त्वाचे .. या प्रवासात माझ्या देशाबद्दल भारताबद्दल कुतूहल अजून वाढले.. परदेशात जाऊन आपल्या देशाला त्रयस्थ म्हणून बघण्याची दृष्टी लाभली.. काय पुढे न्यायचे, काय बदलायचे याचा अंदाज आला…

एक नाटक, एक विचार, एक परिवर्तन हेच आमच्या कलात्मक साधनेचे ध्येय आमच्या भरारीसाठी प्रेरित करते .. आणि या विश्वाला एकसूत्रात बांधण्यासाठी प्रोत्साहित करते. रंगभूमी मग ती माझ्या मातीतली असो किंवा संसाधन संपन्न युरोपमधील असो ती माझ्यातल्या कलाकारामध्ये माणुसकीचे बीज रोवते आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात, विचारात अंकुरित होऊन या विश्वाला माणुसकीचे नंदनवन बनवते…


– अश्विनी नांदेडकर (रंगकर्मीं)


Sunday, July 14, 2019

वैश्विक स्वीकार्यतेचा हुंकार

आपलं महानगर
१४ जुलै २०१९

युरोप हे शिक्षण पद्धतीबाबतीत अग्रेसर आहे... त्यांच्या मते ते विद्यार्थांना प्रत्येक सुविधा पुरवतात... विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत... जर्मन पॅडागॉगी ही जगात शिक्षणासाठी श्रेष्ठ मानली जाते ...चौकटीबाहेर शिक्षणपद्धतीची म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्सची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती. कारण जो वर्ग त्यांच्यासाठी सर्वात मस्तीखोर आणि बंडखोर होता तोच वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने, सृजनशील आणि भन्नाट रीतीने आमच्याशी कनेक्ट झाला.


रंगकर्मी
प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत नसतो … प्रवास बाह्यवातावरण ते अंतर्मन असा असतो … त्या ठिकाणाच्या अणुरेणूपर्यंत असतो …प्रवासाचा थेट परिणाम आपल्या व्यक्तित्वावर होत असतो … म्हणून प्रवासात शोध महत्वाचा असतो …परदेशात आपण निसर्गसौंदर्य पाहतो … पण परदेशीय लोक कशाप्रकारे आयुष्य जगतात?… त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? ते काय खातात? काय परिधान करतात? त्यांच्यात आणि आपल्यात काय साम्य आहे आणि काय वेगळेपण आहे? हे सगळे त्यांच्यात राहिल्याशिवाय आपण नाही अनुभवू शकत.

ही संधी आम्हाला मिळाली …जर्मनीमध्ये गेल्यावर आम्ही प्रत्यक्ष जर्मन परिवारांमध्ये राहिलो …त्यांच्या खाण्यापिण्याची सवय, जगण्याची पद्धत जवळून अनुभवली … ही खर्‍या अर्थाने सांस्कृतिक देवाणघेवाण होती… तेथील घरे म्हणजे स्वप्नवत आहेत.. सगळ्या सुखसोयींनी सज्ज… घरांच्या भोवताली असलेली बाग, फुलांनी डवरलेल्या बाल्कनीज, स्वयंपाक घरातील साधने आणि महत्वाचे म्हणजे चोवीस तास पाणी आणी वीज… आपल्याकडे या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जीवनाचा अर्धा वेळ जातो… आज पाणी येईल का? लाईट जाईल का? पण युरोपमध्ये तसे नव्हते … प्रत्येकाला special खोली, special गाडी, special वागणूक…. पहिल्यांदाच आम्ही चारी बाजूंनी झाडांनी वेढलेल्या एका युथ हॉस्टेलमध्ये राहिलो…जेवणाची वेळ आली त्यावेळी खूप उत्सुकता होती.. पण भात, सलाड, राजमा, चविष्ट वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक ब्रेड, जॅम, ताजी फळं, भाज्या बघून मन तर तृप्त झालेच आणि पोटही तृप्त केले…

तिथे जर्मन विद्यार्थी आणि शिक्षकांचे आम्ही workshop घेतले .. प्रत्येक प्रयोग आणि workshop मधून मिळालेल्या अनुभवातून आम्ही अधिक समृद्ध होत गेलो…सतत भारताचे सांस्कृतिक दूत आहोत हे भान होते..आमचे पहिले workshop हँबर्गच्या शुले अँमसी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होते … जर्मन लोकांसोबत पहिला सुसंवाद… त्याची सुरुवात केली हस्तांदोलनाने…आणि हाच triggerpoint होता आमच्या आणि त्यांच्या मधल्या connection चा …सहभागींना मंजुल सर जाणीव करून घ्यायचे की ही घटना प्रत्येकासाठी ऐतिहासिक आहे, कारण शिकण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी ही सर्वात मोठी सुसंधी आहे… भारतीय विद्यार्थ्यांचे बाहेरच्या जगातील मुलांना भेटणे, शिकवणे अशा घटना सारख्या नाही घडत…या शाळेने मंजुल सरांना request केली की आमच्या शाळेत एका क्लासचे शिबीर घेणार का, जो आमच्या शाळेतील सर्वात खोडकर क्लास आहे …ही मुले अजिबात ऐकत नाहीत…हे आव्हान आम्ही स्वीकारले.


मुळात ही मुले शिक्षणाच्या चौकटीबाहेर असलेली आव्हाने या शिक्षणपद्धतीला देत होती… त्यांच्या भावनिक गरजा, भाषेचा परिवेश, त्यांचे प्रश्न शालेय शिक्षणपद्धती बाहेरील होते … साचेबद्ध चौकटीत बसणारे नव्हते.. आणि जे साचेबद्ध पद्धतीत बसत नाहीत “थिएटर ऑफ रेलेवन्स” त्यांना माणूस म्हणून बघतो …आम्ही या वर्गाला खोडकर क्लास म्हणून न भेटता एक माणूस म्हणून भेटलो. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता त्यांना हे जाणवू दिले की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांना भारतीय नृत्य, संगीताच्या दुनियेत नेलं. त्यात ती रमली, त्यांना प्रोत्साहित केले, वेगवेगळ्या पातळ्या दिल्या. नृत्य, संगीत, नाटक आणि हाच खोडकर-बंडखोर वर्ग परफॉर्म करणार्‍या वर्गामध्ये परावर्तित झाला. हेच “थिएटर ऑफ रेलेवन्सचे” यश होते की नाटक लोकांची मानसिकता बदलवते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवते…या शिक्षणपद्धतीने त्यांना खोडकर अशी छबी दिली होती, आम्ही त्यांच्या उर्जेला सृजनात्मक पद्धतीने मोकळे केले.. त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले आणि ते आमचे मित्र बनले ..
त्यानंतर शिक्षकांची खूप बोलकी प्रतिक्रिया आली की युरोप हे शिक्षण पद्धतीबाबतीत अग्रेसर आहे… त्यांच्या मते ते विद्यार्थांना प्रत्येक सुविधा पुरवतात… विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत… जर्मन पॅडागॉगी ही जगात शिक्षणासाठी श्रेष्ठ मानली जाते …चौकटीबाहेर शिक्षणपद्धतीची म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्सची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती कारण जो वर्ग त्यांच्यासाठी सर्वात मस्तीखोर आणि बंडखोर होता तोच वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने, सृजनशील आणि भन्नाट रीतीने आमच्याशी कनेक्ट झाला … त्यांना खुला मंच दिला आणि त्यांचे जीवन, त्यांची शाळा, संस्कृती, समाज, देश आणि मग विश्वासाठी जागृत केले…

युरोपमध्ये आमच्या ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’चा पहिला प्रयोग अविस्मरणीय होता … या नाटकाचा प्रीमियर होता तोही युरोपमध्ये …पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय रंगमंचावर युरोपियन प्रेक्षकांसमोर नाटक सादर करताना आम्ही खूप उत्सुक होतो …प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की आंतरराष्ट्रीय रंगमंचावर परफॉर्म करावे … एक कलाकार म्हणून माझे स्वप्नापलिकडील जग साकार होत होते … आमचा प्रयोग बघून जर्मन प्रेक्षक marvelous , bravo असा प्रतिसाद देत होते … शून्यापासून सुरुवात केलेल्या कामाचे ते एक फलित होते… आज आपल्याकडे भारतीय रंगभूमीवर किंवा कलाजगतात पाश्चिमात्य शैलीचे अनुकरण केले जाते … तिथे युरोपियन प्रेक्षकांनी आपल्या भारतीय सांस्कृतिक ठेव्याला आमच्या नाटकाला उभं राहून दाद दिली … त्यावेळी मनामध्ये असंख्य विचार येत होते.

ही दाद मिळवण्यासाठी त्याचा मागे किती मेहनत होती हे नजरेसमोर येत होते.. मी थेट इथे येण्यापूर्वीचे दिवस आठवत येत होते. आमची तालीम शांतीवन येथे निसर्गाच्या सान्निध्यात करायचो …धो धो पाऊस असूनही, वीज नसताना, साप विंचू किटक इकडे तिकडे फिरत असतानाही आमची तालीम कधी थांबली नाही. कारण या तालमीत संचित ज्ञानाचा अखंड झरा व्हायचा… प्रत्येक वेळी नवीन अनुभव, नवीन रस्ता, नवीन विचार, नवे आयुष्य…नाटकाचे इतर पैलू जसे रंगमंच, रंगशिल्प, रंगशैली या शब्दांची नव्याने ओळख होत होती…आम्ही नाटकात नृत्य, वादन, गायन एकसाथ live करत होतो ते रेकॉर्रेड नव्हते… म्हणजेच multitasking करत होतो …भारताच्या विविध प्रांतात, वेगवेगळ्या धर्मात असलेले पाण्याचे महत्व आम्ही माहीत करून घेतले … नाटकाची कन्सेप्ट व्यवस्थित समजण्यासाठी विषयाची सखोल माहिती घेऊन अभ्यास केला. आतापर्यंत माझी मूलभूत गरज असलेल्या पाण्याविषयी मला नव्याने कळत होते.. पाणी हा नैसर्गिक हक्क आहे. त्याचे बाजारीकरण होतंय. हे जाणले नाही तर पाण्यावरून युद्ध अटळ आहे. नाटक तर आम्ही करतोय, पण नाटकाविषयी आम्हाला कितपत जाणीव आहे याची दखल घेतली…

एकाच वेळी सगळ्या आयामांवर काम करत होतो, तेही कुठलीही गोष्ट अनुकूल नसताना वातावरण विरोधात होते, परिवाराला काळजी होती. कारण घरची सून, मुलगी, बायको, आई, बहीण ही 66 दिवस परदेशात राहणार होती, इंग्लिश भाषेत नाटक असल्याने स्पष्ट इंग्लिश बोलण्याचे आव्हान होते … आरोग्य सांभाळण्याचे आव्हान आणि सर्वात महत्वाचे की वेळेच्या आधी तयार होणे …

मला एक प्रसंग आठवतो की मी या नाटकात तब्बल सोळा वेशभूषा बदलायचे …आणि सुरुवातीला मी हो नाही करत होते की एवढ्या कमी वेळात मी वेशभूषा कशी बदलू या गोष्टीवर मी अडून बसले … पण हे अडणे मानसिक होते याची जाणीव सरांनी करून दिली.

शिबिरात प्रत्येकजण समान कार्य करायचा … जसे की अनुभव लिहिणे, चैतन्य अभ्यास, नाटक करणे तरीही प्रत्येकासोबत वैयक्तिक प्रक्रिया सुरू होती… प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते …पण प्रत्येकाचा जगण्याचा अनुभव वेगळा होता. कारण प्रत्येकाचे जगण्याचे विचार वेगळे असतात…

नाटक म्हणजे एक आयती स्क्रिप्ट हातात मिळणार, आपण ती वाचून आपली भूमिका असलेलं पाठांतर करणार आणि दिग्दर्शक सांगेल तसे अभिनय करणार …. पण इथे अशी प्रक्रिया नाही घडली … इथे सुरुवातीला आम्ही कलाकारांनी शोध सुरू केला .. पाणी आणि आपण याचा संबंध शोधला तोही वैश्विक स्तरावर… आणि त्यानंतर नवनवीन शोधानुसार नाटक तयार करू लागलो … प्रत्येक वेळी नाटकाची, त्यातील तत्वाची आणि स्वतःच्या वैचारिकतेची पातळी वाढवत गेलो.
वैचारिक पातळी वाढणे म्हणजे वैश्विक स्वीकार्यतेची सुरुवात हा दृढ विश्वास निर्माण झाला.

हीच वैचारिक क्षमता पाणी व त्याचे खाजगीकरण या मौलिक मुद्याला सातासमुद्रापार, म्हणजे जिथून खाजगीकरण आपल्याकडे आले तिथपर्यंत थेट पोहचवण्याचे माध्यम बनली. पाणी म्हणजे नैसर्गिक संपदा, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सत्व, सत्व म्हणजे कला आणि ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’ हे नाटक म्हणजे विश्वाला जगवण्याचा कलात्मक हुंकार…– अश्विनी नांदेडकर (रंगकर्मी)



Sunday, July 7, 2019

भरारी…

आपलं महानगर
७ जुलै २०१९

मी निघाले होते युरोपला एक व्यक्ती म्हणून, माझे अस्तित्व घडवण्यासाठी... ... आई, बहीण, पत्नी, मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून ... माझ्या कलात्मक समर्पणाच्या जोरावर ... मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित "ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर" हे नाटक घेऊन ...घरातून निघून एअरपोर्टपर्यंत केलेला एक तासाचा प्रवास मला खोल विचारात घेऊन गेला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा परदेशात निघाले होते तेही स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून.





स्वप्नांची सुरवात

माझी उडाण..

आकाशात असल्यासारखं वाटतंय


आता सवय झाली आकाशाची

इथून जग अजून सुंदर वाटतंय

अजून आपलंसं वाटतंय

पंखातलं बळ वाढवायचं

आता ढगांमध्ये विसावा घेईन म्हणते

पावसाचं पाणी प्यावे म्हणते

सारं विश्व डोळ्यात सामावून परत धरतीकडे झेप घेईन म्हणते ..

युरोप एक सुंदर खंड … निसर्गाने भरलेला आणि व्याप्त असलेला … भारतीय सिनेमातून आपल्याला अनेकदा याचे दर्शन झाले आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात कधीतरी परदेशवारी करून ते जग पाहण्याची अनुभवण्याची इच्छा जागृत झाली … विदेशात जाणे तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे … निवडक ठिकाण पाहून आनंद घेणे … या सगळ्यात मीही होते पण खरंच एव्हढ्यापुरता आपली मानसिकता मर्यादित आहे का? आपण परदेशवारी करतो पण या परदेशवारीला बघण्याचा आणि अनुभवण्याचा आपला दृष्टीकोन काय असतो? मनोरंजन की शोध … खूप मेहनत करून आपण पैसा कमावतो … आणि आपण मेहनतीने कमावलेला पैसा या सौंदर्याला पाहण्यासाठी खर्च करतो … आयुष्यातील काही चार दिवस मौजमजा करून येतो … पण हा अनुभव कमावणे जमतो का ? की युरोप बघून आलो छान वाटले इथपर्यंत मर्यादित राहतो.

मी निघाले होते युरोपला एक व्यक्ती म्हणून, माझे अस्तित्व घडवण्यासाठी… … आई, बहीण, पत्नी, मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून … माझ्या कलात्मक समर्पणाच्या जोरावर … मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर” हे नाटक घेऊन …घरातून निघून एअरपोर्टपर्यंत केलेला एक तासाचा प्रवास मला खोल विचारात घेऊन गेला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा परदेशात निघाले होते तेही स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून. खरंतर ज्यावेळी स्वप्न प्रत्यक्षात उतरायला लागतात त्यावेळी चटकन विश्वास नाही बसत आणि ही तर स्वप्नापलिकडील गोष्ट होती …कधी हा विचारच केला नव्हता की मी युरोपला जाईन. खरंच मी स्वतःबद्दल हा विचार का कधी केला नाही? का कधी स्वतःवर हा विश्वास ठेवला नाही. माझ्यात उंच भरारी घेण्याचे बळ आहे, ही योग्यता मला ठाऊकच नव्हती. कोणी कधी सांगितले ही नाही.. का सांगितले नाही? माझ्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांच्या, परिजनांच्या डोक्यातही आले नाही .. कारण सतत स्वतःला, स्वतःच्या मानसिकतेला एका चौकटीत अडकून घेतले आहे … स्वप्न पाहण्याची मति कुंठीत झाली आहे… क्षितिजा पल्याड पाहायची सवयच नाहीए.. या चौकटीला तोडत मी निघाले होते माझ्यातील आई, बहीण, मुलगी, सून , बायको या रुपांना

समृद्ध करण्यासाठी माझ्यातल्या अश्विनी नावाच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करण्यासाठी मी निघाले होते.मुंबईचे इंटरनॅशनल एअरपोर्टवर आमचा ग्रुप आमच्या भरारीची वाट पाहत होता .. पहिल्यांदा देशाच्या बाहेर पाऊल ठेवणार होते … आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार होते … त्यामुळे उत्सुकता आणि जबाबदारीचे भानही होते … तिथे आम्ही भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून गेलो होतो तिथे एक व्यक्तीपेक्षा माझी ओळख भारत इंडिया ही होती … त्यामुळे माझी वागणूक, माझी क्रिया, माझे बोलणे आणि माझे काम ही माझी नाही तर भारताची छबी निर्माण करत होती… मुंबई एअरपोर्टला पहिल्यांदा इमिग्रेशन फॉर्म भरताना सुरक्षितता, दुसर्‍या जगात जाण्याची भावना निर्माण होत होती …विमानात बसण्याचा अनुभव आधीही होता, पण इंटरनॅशनल प्रवासाची पहिलीच अनुभूती होती … माझं त्यादिवशीचे दुपारचे जेवण मी ढगांवर बसून घेत होते. विमानाच्या खिडकीतून दिसणारे विश्व नवखेच होते. मुंबई सोडून जसे जर्मनीच्या दिशेने प्रवास सुरु केला तसा एक ठळक फरक जाणवला. सगळी जमीन हिरवीगार. जर्मनीला आकाशातून पाहताना जाणवले की जमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर केला गेलाय … चौकोना चौकोनात शेत, टुमदार घरं नाहीतर जंगल होते …कोणताही जमिनीचा भाग रिकामा नाही, ओसाड नाही …असे आकाशात तरंगत ढगांच्या सान्निध्यात माझ्या विचारांची मालिका सुरू होती …

हॅमबर्ग या शहरात आमचे विमान लँड झाले. जर्मनीमधील दुसरे सर्वात मोठे शहर. 18 लाख जनसंख्या असलेले शहर. त्या जमिनीवर पाऊल ठेवताना क्षणभर मनात प्रसन्नता पसरली. ज्यावेळी क्षितिजा बाहेरील स्वप्न खरी होताना जाणवत होती. आयुष्यात एक स्त्री म्हणून, एक गृहिणी म्हणून भूमिका पार पाडताना कधी एक माणूस म्हणून स्वप्न पाहायची आणि ती याच धरातलावर पूर्ण करायची भूमिका सुरू झाली कळलेच नाही.

हम्बर्गला विमानतळावर उतरल्यावर एक सुगंध मनात झिरपला. आयोजक आम्हाला receive करायला आले होते. आपल्याकडे मध्यमवर्ग स्वप्न पाहत असतो की दारात एक चारचाकी गाडी असावी. जर्मनी हा देश कार्स बनवण्यात अग्रेसर आहे. अशा देशात आम्हाला घेण्यासाठीही आयोजक आलिशान कार घेऊन आले होते ड्रायव्हर सह .. पण यात मला सर्वात विशेष वाटले ते आयोजकांचे. ते स्वतः मात्र सायकलवर आले होते, तेही एअरपोर्टला .. आणि सायकलनेच त्यांच्या ऑफिसला जाणार होते. माझा देश कार्स बनवतो. माझ्या दारात कार आहे, पण माझी आवड माझे आरोग्य काय सांगते हे जास्त महत्वाचे वाटले.

जर्मनीमध्ये उतरल्यावर माझा पहिला प्रश्न होता की कर्फ्यु लागला आहे का? कारण गर्दी कुठे आहे ? माणसे दिसतच नव्हती. मुंबईसारख्या शहरात गर्दीची इतकी सवय झाल्यावर गर्दीविरहीत रस्ते पाहणे वेगळेच होते … स्वच्छ वातावरण आणि ठळक जाणवणारी स्वच्छता, शिस्तबद्धता नजरेत भरत होती. परदेशात जागा वेगळी, व्यक्ती वेगळ्या, त्यांची संस्कृतीही वेगळी, खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या या सगळ्या वेगळ्या वाटणार्‍या वातावरणात आपण सामावून जातो ज्यावेळी आपण मनाने मानतो की हे जग माझे आहे. हा विश्वास आपल्याला जगात कुठेही ठामपणे उभे राहायला शिकवतो. भारतातून यूरोपपर्यंतचा प्रवास केवळ शारीरिक नव्हे तर वैचारिक कक्षा रुंदवणारा होता. आता प्रवेश नव्या परिवेशात.. क्रमशः

अश्विनी नांदेडकर ( रंगकर्मी)




Sunday, June 30, 2019

रचनात्मक सृजनतेचे कलात्मक तरंग


आपलं महानगर 
३० जून,२०१९

मी सर्वांना सजग करत म्हणालो, निसर्ग केवळ आपल्यासाठीच नाही, तर इतर जीवजंतूही आहेत, भेगाळलेल्या जमिनीत कुठला प्राणी लपलेला असू शकतो, जरा सावध होऊन बसा. सर्व सजग व सहज अवस्थेत, माझ्या तरंगांसोबत जोडण्यासाठी आपले तरंग शोधत होते. सोनेरी संध्याकाळ आपला रंग बदलत होती...आणि हळूहळू रात्र होऊ लागली.




युसूफ मेहरअली सेंटर, पनवेल येथील अभिनय कार्यशाळेत व्यक्ती आणि कलाकार यांना जोडण्याच्या, घडवण्याच्या प्रक्रियेत आलेले अनुभव
जूनचा पहिला आठवडा…
कडक ऊन आणि गर्मीच्या दुपारनंतर संध्याकाळी, थिएटर ऑफ रेलेवन्स अभिनय कार्यशाळेत एक व्यक्ती ‘राजगती’ नाटकाच्या सकारात्मक प्रभावाने प्रभावित होऊन देशाच्या स्थितीला आपण कसे बदलू शकतो या हेतूने भेटायला आले होते. त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि मी एका मागोमाग एक त्यांच्या अपेक्षांनुसार त्यांना आपली सैद्धांतिक प्रस्तावना व नियोजनाची कार्यसूची प्रस्तावित करत होतो. जवळजवळ तासभराच्या वैचारिक मंथनाने माझ्या आतील वातावरण तरंगीत होत गेले..

चर्चा संपल्यानंतर जेव्हा मी चारीबाजूला न्याहाळले त्यावेळी संध्याकाळ सावळी नाही सोनेरी झाली होती. सोनेरी वातावरण सर्वत्र पसरले होते. वातावरण बदलले होते, दमट असूनदेखील थंड वाटत होते. सोनेरी संध्याकाळ असूनही सर्व स्वच्छ दिसत होते. त्यावेळी मी समूहाला म्हणालो, चला चैतन्य अभ्यासाला जाऊया. आम्ही सारे त्वरित चैतन्य अभ्यासासाठी निघालो. इतर जीवजंतूना लक्षात घेत आम्ही शेतात पोहोचलो. जंगल आणि छोट्या टेकडीच्या कुशीत असलेले शेत धान्य कापणीनंतर तापले होते, सुकलेल्या जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि जमीन पावसाची वाट पाहत आकाशाला न्याहाळत होती. सुकलेले गवतदेखील सोनेरी संध्या प्रकाशात चमकत होते. मी माझ्या पूर्ण प्रवाहात राजनैतिक चर्चेत आलेला अनुभव, समूहासोबत वाटण्यासाठी उत्साहित होतो. अनुभव सांगण्याची उत्कंठा होती.

समूहातील एका सदस्याला मी विचारले, सांग या शेतात तुला काय दिसते आहे? सदस्य माझ्या चेतनेच्या तरंगाबाहेर होता. आमची wave length जुळली नाही. समूहातील बाकी सदस्यांची चेतना जागृत झाली. असमंजस, भीती अनोखेपण हे भाव आणि कुतूहल सर्वांच्या नजरेत होते. माझ्या कलात्मक तरंगांना समूहातील सहभागींसोबत जोडता न आल्यामुळे माझ्या तरंगीत आवेगावर पाणी फेरले गेले.


आकाशात वीज चमकताना जाणवली आणि मी समूहाला म्हणालो, चला परत जाऊया समूहाच्या सदस्यांनी धैर्य एकवटून थोडावेळ थांबण्याचा आग्रह केला, मी मौन स्वीकृती दिली आणि आम्ही शेतामध्ये जंगलाच्या दिशेने पुढे चालू लागलो. समूह स्वतःला सांभाळत, कुजबूजत चालला होता. मी माझ्या उर्जेला परिवारासोबत फोनवर संवाद करून परावर्तित केले. पाच दहा मिनिटांनंतर मी पुन्हा समूहासोबत जोडलो गेलो, तरंगित आवेग (मनाची एक स्थिती) कायम होता; पण मन शांत धीरगंभीर होऊन संप्रेषण यंत्रांच्या शोधात होते. मी स्वतःला निसर्गात सोडले आणि आम्ही सारे शेतात बसलो.

मी सर्वांना सजग करत म्हणालो, निसर्ग केवळ आपल्यासाठीच नाही, तर इतर जीवजंतूही आहेत, भेगाळलेल्या जमिनीत कुठला प्राणी लपलेला असू शकतो, जरा सावध होऊन बसा. सर्व सजग व सहज अवस्थेत, माझ्या तरंगांसोबत जोडण्यासाठी आपले तरंग शोधत होते. सोनेरी संध्याकाळ आपला रंग बदलत होती…आणि हळूहळू रात्र होऊ लागली. वातावरण दमट होते तरी गार वाटत होते… वाढत्या अंधारात समूहातील एक सदस्य उत्साहाने ओरडली काजवा, कुतूहलाच्या तरंगांनी संपूर्ण समूहाला घेरले..क्षणार्धातच आमच्या चहूबाजूंच्या झाडांवर असंख्य काजवे लखलखत होते. समूहातील सदस्यांच्या अपेक्षा आणि स्वप्नेदेखील त्यांच्या मनात काजव्यांप्रमाणे चमकू लागले. हजारो काजवे बाहेर तर हजारो इच्छा काजव्यांप्रमाणे सर्वांच्या आत झगमगत होत्या. या इच्छांची चमक तरंगीत होऊन संपूर्ण समूहाच्या कलात्मक तरंगांना चमकवीत होती !

येथे एक पैलू हा आहे की, चार वर्षांपूर्वी, नाटक अनहद नाद नाटकाच्या पहिल्या प्रस्तुतीआधी
काजवे एका झाडावर दिसले आणि आज चार वर्षांनंतर .. आश्चर्यकारक .. अलौकिक अनुभव…

create, radiate and resonate
ज्ञान आणि अज्ञान (मूर्खपणा) चा संघर्ष, व्यक्तिच्या संप्रेषण क्षमतेची मर्यादा, व्यक्ती होण्याच्या अधिकाराचा सन्मान, कलात्मक सिध्दी आणि अपेक्षा, कलाकार आणि त्याची कलेतून स्वतःला कोरून आकार देण्याची प्रतिबद्धता. या सगळ्यांमध्ये तरंगणार्‍या आणि जूनच्या उष्मीत वातावरणात होरपळून जाणार्‍या कार्यशाळेत व्यक्ती आणि कलाकाराच्या आयमांना मंथन करण्याची प्रकिया सुरू होती. कलाकाराकडून सतत आपल्या व्यक्तितल्या खोटेपणाला वेगवेगळ्या अभिनयाच्या पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यक्तितल्या कमजोरीला लपवण्याचे असफल प्रयत्न. प्रत्येक प्रयत्न ना व्यक्तीला स्पर्श करत होता आणि ना ही कलाकाराचा विश्वास पक्का करत होता.

यामध्येच कार्यशाळेतील दोन दिवस निघून गेले. कलाकार रंगमंचाच्या मध्यभागी, मी समोर बाकी सहभागींसोबत प्रेक्षकांसारखा बसलो आहे… कलेच्या नावाखाली पाखंड होत आहे हे बघून माझा राग प्रचंड वाढत होता. फक्त एक क्षण धैर्याने मला सांभाळून ठेवले होते. मनात येत होतं की मी या कलाकाराचे दगडाप्रमाणे तुकडे तुकडे करून टाकू, खूप प्रहार करू, मातीसारखं एक एक कण वेगळा करून, त्या मातीला रगडू आणि मग त्यात सत्वाचे अमृत मिसळून त्याला एकरूप करू आणि त्यातून एका सात्विक व्यक्ती आणि कलाकाराला आकार देऊ. हे मनन करता करता रागाने माझ्या पूर्ण मेंदूला व्यापले आणि अचानक निद्रावस्था मला माझ्या अर्धचैतन्य अवस्थेत घेऊन गेली. मी बसल्या बसल्या स्वतःच्या जागेवर थोड्या वेळासाठी झोपून गेलो.

दुसर्‍याच क्षणी कलात्मक तरंगातल्या विश्वाने मला सामावून घेतले. मंचावर कलाकार स्तब्ध, शिथिल आणि मूढ, जड अवस्थेत… अगदी मंचाच्या मध्य भागी… माझ्यातल्या तरंग विश्वाने त्याला स्पर्श केले आणि जे मी रागाच्या मानसिकतेत विचार करत होतो.. त्या कल्पनेला कलाकार परफॉर्म करू लागला. त्याने मंचाला आपल्या पाच प्रतिमाप्रमाणे पाच भागांत विभागले. एक अभिनय, चित्रकार, गायक, व्यक्ती आणि साधना स्थळ. प्रत्येक भागाची प्रतिमा म्हणजे छबीला उचलले.. एकत्र ठेवले त्यांना तोडले, प्रहार केला आणि एक एक कण वेगळा केला, मग त्यात पाणी मिसळून त्याला एकरूप केले.. त्या मिश्रणाला चाकावर ठेवले आणि त्याचे एक मडके बनवले. त्या मडक्याला उचलून मंचाच्या मध्यभागी आणले आणि आगीवर ठेवले.


स्वतःची ध्यान साधना करत आपल्या व्यक्तीतील सद्विवेक बुद्धीच्या भट्टीत तापवले. मडकं मजबूत झाल्यावर म्हणजेच व्यक्तीच्या विवेकाचा पाया रचून त्यावर आपल्या व्यक्तित्वाला घडवत कलाकाराने कला सत्वातून प्रेक्षकांना अभिभूत केले. जेव्हा माझी कलात्मक तरंग कलाकाराला स्पर्श करत होती तेव्हा मी मध्ये मध्ये डोळे उघडून पाहत होतो की, कलाकार मला बघण्यात गुंग तर नाही झाला.. पण कलाकाराने कलात्मक सिद्धीला जगत कलात्मक आनंदाने आपल्या विखंडित झालेल्या व्यक्ती आणि कलाकाराच्या दोन टोकांना जोडले होते. प्रस्तुतीनंतर सर्व सहभागींनी आपला अभिप्राय दिला. प्रत्येकाला connection जाणवले. मी सगळ्यांना विचारले की हे तर तुम्ही पाहिले.. पण ते सांगा जे प्रस्तुती बघताना तुमच्या आत घडत होते.. म्हणजे तुम्ही काय पाहिले ते वेगळे.. बघताना तुम्हाला काय होत होतं ते वेगळं.. मग मी प्रस्तुती बघताना माझ्या आत जे घडत होते ते सर्वांना सांगितले.. माझा प्रवास, कलात्मक तरंग भावाची हुबेहूब जाणीव आणि त्यापासून उत्प्रेरित होण्याची प्रकिया व त्याचा पुरावा कलाकाराने जेव्हा सांगितला, तेव्हा सगळे अवाक झाले. कला साधनेत चैतन्य-अर्धचैतन्याच्या कलात्मक तरंग आणि त्याचे सृजन, विकिरण आणि गुंजन …सृजनकार म्हणून create, radiate and resonate चे हे अद्भूत अनुभव अनुभवले !


-मंजुल भारद्वाज (रंगचिंतक व तत्वज्ञ)




Tuesday, June 25, 2019

अंतर्नादचा उन्मुक्त हुंकार…

आपलं महानगर 
२३ जून,२०१९


नाटकात किंवा कलेत ही ताकद असते की माणसाच्या व्यक्तिगत अनुभवाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्याला उन्मुक्त करण्यासाठी, माणसात असलेल्या कलेला नाटक जिवंत करते. माणूस हा शरीर आहे तर कलाकार त्यातला प्राण! हा कलाकार नाटकातल्या पात्राची बौध्दिकता समजून, स्वतःच्या कलात्मक सत्वाला प्राप्त करून, व्यक्तीला कलेशी जोडतो आणि दोघांचाही स्तर वाढवतो.



कलाकारांना कुठलीही कृती करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते?
प्रेरणा मिळते ती विचारांनी, विचार संदर्भ शोधतात, संदर्भ शोध प्रक्रिया वाढीस नेतात आणि स्व-अस्तित्वाची निर्मिती होते. कलाकारामध्ये अस्तित्व निर्माण करण्याची दृष्टी जोपर्यंत सृजित होत नाही, तोपर्यंत प्रत्येक संदर्भाशी तो नातं कसं जोडेल..? आणि हे नातं जुळले नाही तर मग नाटकातल्या पात्राची बौध्दिकता, त्याची कलात्मक उंची, वैचारिक प्रतिबद्धता कशी गाठणार? अभिनयासाठी हे तीन पैलू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात :

1. मी स्वतः कोण आहे? 
2. माझ्या पात्राची बौद्धिक पातळी आणि कलात्मक उंची काय आहे ? 
3. दृष्टी संपन्न अभिनय

कला ही निरंतर शोध प्रक्रिया आहे, जेव्हा कलाकार एकाच अनुभवाला, संदर्भाला घेऊन रंगमंचावर येतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर अनेक प्रयोगात आपली भूमिका पार पाडत असतो, तेव्हा त्याला कलाकार म्हणता येणार नाही, तो एक मेकॅनाईझड (स्टाईल्ड) अ‍ॅक्टर आहे, ज्याला तीच वातावरण निर्मिती लागते, त्याच अनुभवाचा आधार हवा असतो, तेच स्टाईल्स हवे असतात आणि त्याच टाळ्यांच्या गडगडाटीची भूक असते. खरंतर कलाकार म्हणजे क्षणोक्षणी होणारी सृजना जी कुठल्याच ठरलेल्या साच्यात बसत नाही. कधी आपण हा विचार करतो का, की या टाळ्यांच्या कल्लोळापलीकडे कलाकाराचा स्वतःचा एक आवाज आहे, जो ऐकण्याऐवजी दरवेळी दुर्लक्षित होत असतो?


असं म्हटलं जातं की कलाकाराला आवाज असतो. तो त्या आवाजाने वेगवेगळी पात्र, भूमिका साकारतो. लेखकाचा विचार आपल्या अभिनय कौशल्याने, आवाजाच्या माध्यमाने त्या प्रत्येक विचाराला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. दृश्य, सदृश्य, अदृश्य अशा कैक विचारांची किमया आवाजाच्या तरंगांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत, अखंड वातावरणात चैतन्य निर्माण करून कलात्मकतेचा उदय करतो. मी आतापर्यंत रंगभूमीवर जेवढी नाटकं पाहिली किंवा केली. त्या प्रत्येक नाटकांमध्ये मी ध्वनी यंत्रणा, संगीत संयोजन, आवाचा चढ-उतार, आवाजाने प्रेक्षकांना होल्ड करणे हे सगळे महत्त्वाचे पैलू अनुभवत आले; पण या सर्व प्रवासात माझी एक बाजू सुटत होती ती म्हणजे स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याची.

स्वतःचा आवाज ऐकणे म्हणजे नेमकं काय? जिवंत असल्याची निशाणी.. स्वतःशी संवाद करण्याची सुरुवात.. खरेपणा आणि माणुसकीला रुजवण्याची प्रक्रिया.. संवेदना आणि सहवेदनांची जाणीव.. या सगळ्या मानवी मूल्यांना मुळापासून नष्ट करण्याचे षड्यंत्र आज बाजारीकरण रचत आहे. फेम आणि ग्लॅमरच्या चौकटीत अडकून कलाकार कठपुतली होत आहेत. दुसर्‍यांच्या इशार्‍यावर केवळ शारीरिक क्रिया करणे, ज्यात स्वतःच्या मेंदूचा, विचारांचा, तत्वांचा काहीच उपयोग होणार नाही असे षड्यंत्र रचले जात आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कलाकाराने साधलेली सिद्धी त्याच्या हातून सुटत चालली आहे, याची कलाकारांना अजून जाणीवही होत नाही.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित दिग्दर्शित नाटक अनहद नाद – अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स मधल्या अपनी अनसूनी आवाज सुनो या गाण्यामुळे मला स्व-अस्तित्वाची जाणीव झाली. अशा चंदेरी दुनियेत जिथे दिखाव्याला महत्त्व दिले जाते, जिथे कला किंवा नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते, जिथे रंगभूमीवर मुखवटा चढवून केवळ प्रसिद्धीसाठी कलेचा र्‍हास होत आहे, तिथे या नाट्य प्रक्रियेतून मी स्वतःचे सत्व साधून, कलेला आणि कलाकारांना उन्मुक्त करत, कलात्मक सत्व जपत आहे. आणि या कलात्मक सत्वाने आयुष्य जगण्याचे सौंदर्य वाढवत आहे.

रंगकर्म एक साधना आहे आणि अभिनय म्हणजे अभिव्यक्तीची निरंतर असणारी शोध प्रक्रिया. कलाकाराची साधना हीच त्याची खरी सिद्धी आहे आणि हीच प्रक्रिया आपोआप प्रसिद्धीही मिळवून देते. एक अशी ओळख जी कायमस्वरूपी आपली राहते. अपनी अनसूनी आवाज सुनो या गाण्याने मला, माझी एक जगावेगळी ओळख मिळवून दिली. हे गाणं गात असताना जशी मी स्वतःच्या आत जाऊ लागते तसा माझा स्वतःचा आत्मिकशोध सुरू होतो. प्रेक्षक जेव्हा हे गाणं ऐकतात तेव्हा त्यांना ही या आत्मशोधाची प्रचिती होते आणि प्रत्येक जण स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी स्वयंप्रेरित होतो. कलाकार रंगभूमीवर अनेक पात्र साकारतो; पण तो आयुष्यात व्यक्ती म्हणून कोण आहे हे जोपर्यंत त्याला माहीत नसेल तोपर्यंत तो उत्तम कलाकार होऊच शकत नाही. यासाठी आत्मशोध ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. या नाटकाने माझ्यातल्या कलाकाराला तर बहरलेच सोबत माझ्यातल्या व्यक्तीला आकार देण्याची शक्तीही मला दिली.

नाटकात किंवा कलेत ही ताकद असते की माणसाच्या व्यक्तिगत अनुभवाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्याला उन्मुक्त करण्यासाठी, माणसात असलेल्या कलेला नाटक जिवंत करते. माणूस हा शरीर आहे तर कलाकार त्यातला प्राण! हा कलाकार नाटकातल्या पात्राची बौध्दिकता समजून, स्वतःच्या कलात्मक सत्वाला प्राप्त करून, व्यक्तीला कलेशी जोडतो आणि दोघांचाही स्तर वाढवतो. अशी प्रक्रिया व्यक्ती आणि कलाकार दोघांना समृद्ध करते. आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतानुसार कलाकार आणि व्यक्ती हे दोघेही दोन वेगळ्या भूमिका असल्या, यांच्या जगण्याचा मार्ग जरी वेगळा असला, यांचा प्रवास ही वेगळा असला, तरीही हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, कोलॅबोरेट करतात. कारण कलाकार आपल्या सत्वातून कलेला समृद्ध करत असतो आणि व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला उन्मुक्तपणे जगत असतो.

जीवन ही जगण्याची एक कला आहे. जसं कलेला विकलं जाऊ शकत नाही तसेच आयुष्यातल्या अनमोल अनुभवांना विकत घेतले जाऊ शकत नाही. या नाटकातून मी हेच शिकले की आपले आयुष्य हे नफा तोटा लिहिण्याची बॅलन्सशीट नाही आहे. एक कलाकार म्हणून आपल्या भावनांना वैचारिक दृष्टीकोन देऊन रंगमंचावर अभिव्यक्त होणे आणि एक व्यक्ती म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगणे हीच माझी कला आणि जीवनाप्रति निष्ठा आहे.

अपनी अनसुनी आवाज सुनो 
– मंजुल भारद्वाज

अपनी, सबकी और सारे ब्रह्मांड की 
अनसुनी आवाज सुनो !

मानवीय विष को पीना ही 
कला का ध्येय है

संवेदना है उत्पाद नहीं 
कला का अब व्यापार नहीं

साधना है, कारोबार नहीं 
सुनो सुनो आवाज़ सुनो

अपनी अनसुनी आवाज़ सुनो 
अपनी, सबकी और सारे ब्रह्मांड की आवाज़ सुनो !

- कोमल खामकर – रंगकर्मी



Sunday, June 16, 2019

अभिनय एक आत्मचिंतन…

आपलं महानगर 

१६ जून  २०१९



प्रामुख्याने नाटकामध्येही नाटकाची संहिता किंवा संकल्पनेऐवजी नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर खूप भर दिला जातो. म्हणूनच अभिनय हा गिमिकमध्ये अडकून आहे किंवा पाश्चिमात्य शैलीत अडकलेला आहे. थिएटर ऑफ रेलवन्सच्या नाट्य प्रक्रियेत समजले की, अभिनय बाहेरील स्रोतांवर अवलंबून नसतो, तर अभिनय एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी एक व्यक्ती म्हणून स्वतःलाच स्वतःसोबत करावी लागते.

आत्मचिंतन ते अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीतून आत्मशोध. आत्मशोधातून आत्मप्रेरणा…हा प्रवास मी केला, जगला आणि अनुभवला..या आत्मशोधासाठी मला माझ्या अभिनय प्रक्रियेने खूप प्रेरणा दिली. प्रेरणा मिळते ती तत्वाने, चिंतनाने, संकल्पनेने. संकल्पनेतून संदर्भाचा शोध वाढीस लागतो.

शोधातून आत्मशोध….. आत्म म्हणजे ‘मी’..मी स्वतःला ओळखते का? मी या जगात का आहे? माझ्या जगण्याचे ध्येय काय? या प्रश्नांतून विचारांच्या प्रवासाला सुरुवात झाली..आणि समजलं की आयुष्याच्या सर्व गोष्टींमधून वाट काढत स्वतःला समजण्याची यात्रा … म्हणजे आत्मशोध… अभिनय आणि आत्मशोध यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे…


तो असा की कलाकार नेहमी स्वत:ला सतत आपल्या कलेतून नव्यानं शोधत असतो… कोणतीही कला आत्मशोधाला प्रेरित करते…नाट्यकलेच्या माध्यमाने अभिनेता, अभिनेत्री अभिनयातून अभिव्यक्त होतात…अभिव्यक्त होणे म्हणजे स्वतःच्या मनातील भावना, विचार जसे आहेत तसे मांडणे की त्यांना दिशा देऊन अभिव्यक्त करणे, यासाठी आत्मशोध !
नाट्यकला माझ्या अभिव्यक्तीचे माध्यम ठरली…

नाटकाची आवड कॉलेजमध्ये शिकत असताना जडली…एकांकिका करता करता कळले की आपल्याला नाटकातील अभिनयही बर्‍यापैकी जमतोय…सुरुवातीला नाटकाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन तात्कालिक आवड किंवा हौस म्हणूनच होता. हे माझ्याच बाबतीत आहे असे नाही, तर कलाकार होऊ इच्छिणार्‍या बहुतांश व्यक्तींकडून मी हे असेच ऐकले आहे. तर मुद्दा हा की, एकांकिकामधून, नाटकांतून काम करताना..दिग्दर्शक म्हणेल ते करायचे. दिग्दर्शक सांगायचा की दोन पावले चाल..मग मागे वळून डायलॉग बोल, ती जागा घे, लाईट घे.. पण त्याचा संदर्भ काय हे नाही सांगायचा…मी सांगतो म्हणून कर.

स्थिर भाव, रोमांच भाव, आक्रोश आणि एक्साईटमेंट हे सर्व दिग्दर्शक सांगायचा…शून्यात बघत सोलोलोकी बोलायची…. एका श्वासात संवाद बोलायचा.. दोन पावले चालून असे वळायचे..मग फुटेज घे….मग मध्येच पंच टाकायचा, आवाजाचा थ्रो शेवटच्या रांगेपर्यंत जायला हवा आणि पात्र दाखविण्यासाठी तशी वेशभूषा करायची…इत्यादी…इत्यादी ..हे करता करता अशीच माझीही समज झाली की हाच अभिनय आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्य प्रक्रियेत येऊन समजले की, नाटक रंगमंचावर येण्याआधी मेंदूत जन्म घेते. मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित छेडछाड क्यों? नाटकाची सुरुवात झाली तेव्हा कळलं की अभिनय आणि मेंदू यांचा संबंध आहे…अभिनय म्हणजे विचार …अभिनय म्हणजे थिंकिंग प्रोसेस…हे समजले.

तथाकथित रंगभूमीवरील दिग्दर्शक सगळ्या तांत्रिक बाजू सांगून कलाकाराला नक्कीच कुशल करतो; पण कलाकारासाठी महत्त्वाची आहे ती त्याच्या मेंदूची मशागत ती कुठला दिग्दर्शक करतो? किंवा ही बाजू समजणारे दिग्दर्शक मोजकेच असतात…

प्रामुख्याने नाटकामध्येही नाटकाची संहिता किंवा संकल्पनेऐवजी नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर खूप भर दिला जातो. म्हणूनच अभिनय हा गिमिकमध्ये अडकून आहे किंवा पाश्चिमात्य शैलीत अडकलेला आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाट्य प्रक्रियेत समजले की, अभिनय बाहेरील स्रोतांवर अवलंबून नसतो, तर अभिनय एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी एक व्यक्ती म्हणून स्वतःलाच स्वतःसोबत करावी लागते. म्हणून अभिनयासाठी व्यक्ती सक्षम असणे आवश्यक आहे.

नाटक ही एक मनोवैज्ञानिक कला आहे. ती जेवढी सांघिक तेवढीच वैयक्तिक प्रक्रिया आहे. सहसा आपण पाहतो की, नाटकात एक कलाकार म्हणून माझा रोल, माझे कॅरॅक्टर, माझे संवाद इथपर्यंतच कलाकार मर्यादित असतात. पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेत केवळ संवाद आणि रोलपर्यंत मर्यादित न राहता…आम्ही कलाकार पूर्ण नाटकाच्या संकल्पनेला आपलंसं करण्यासाठी नाटकाच्या सर्व दृश्यांना इन्डिव्हिज्युअली परफॉर्म करतो. जेणेकरून मला माझ्यासोबत, माझ्या सहकलाकारांचा नाटकातील प्रवास कळतो व त्यातून एक कलाकार म्हणून अभिनयाची व्यापकता वाढते.

अभिनयासाठी आवश्यक असणारा अजून एक पैलू म्हणजे निरीक्षण.. तथाकथित रंगभूमीवर नाटक करत असताना सांगितले जाते की निरीक्षण करा पात्राचे..वस्तूूूचे आणि तशीच हुबेहूब नक्कल करा; पण थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य प्रक्रियेत समजले की अभिनयासाठी उपयुक्त असलेला निरीक्षण हा आयाम केवळ निरीक्षण करून नक्कल करण्याइतपतच न राहता केलेल्या निरीक्षणाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे…ज्याने पात्राची मनोभूमिका कळते. निरीक्षण केलेली घटना, वस्तू किंवा व्यक्ती, कार्य यांचा माझ्याशी संबंध काय? त्याकडे पाहण्याची माझी दृष्टी काय? याचे विश्लेषण आधी केले जाते. नाटकात एक पात्र कलाकार रंगवत असतो, हे पात्र समाजाच्या घटकातून आलेले असले तरी एक व्यक्ती म्हणून माझ्या शरीरात त्याला जागा द्यायची आहे, म्हणजे एक पात्र त्याची विचारसरणी, त्याची जीवनशैली, त्याचे भाव, त्याची अंगयष्टी याला स्वतःच्या आत उतरवण्याची मनोवैज्ञानिक प्रक्रिया मला करण्यासाठी आधी स्वतःला जाणणे महत्त्वाचे आहे. म्हणून बाहेरील निरीक्षणाआधी आत्मनिरीक्षण-आत्म अवलोकन करणे आवश्यक आहे.

पारंपरिक अभिनय शैलीत रंगभूमीवरील मातब्बर रंगकर्मी स्वतःला 15-15 दिवस एका खोलीत बंद करून घेत होते, आणि खोलीबाहेर पडून एकाच भावमुद्रेत राहत होते. त्यांनी रंगभूमीवर अभिनयाचा एक मानदंड स्थापित केला आहे. इथे माझा प्रश्न आहे की, जडत्व तत्व आहे का? हे जडत्व म्हणजे चरित्र आहे का? की जडत्वाने प्रेक्षकांना केवळ एक भाव दाखवणे.

पारंपरिक अभिनय शैलीतील हाच वरवरचा भाव संमोहनापर्यंत घेऊन जातो किंवा हा भाव तत्कालीक संमोहित करतो. पण मेंदूला भेदत नाहीत. असे रंगकर्मी अभिनय भावमुद्रा करून तत्काल प्रभाव टाकतात आणि थिएटर ऑफ रेलेवन्सची अभिनय प्रक्रिया मंथन विवेचनेकरिता चैन रिअ‍ॅक्शन सुरू करते.

कलाकृती कोणतीही असो, कलाकृतीमधील समग्रता व जाणीव त्या कलाकृतीला व्यक्ती व काळासोबत जोडते आणि थिएटर ऑफ रेलेवन्स ही जाणीवच प्रत्येकात निर्माण करते. जाणीव माणुसकीची… जाणीव स्वतःच्या असण्याची. जाणिवेतून तत्वाची मांडणी होते. या तत्वाने रंगभूमीवर जेव्हा नाटक होते तेव्हा ते नाटक निव्वळ रंजनात्मक न राहता चेतनात्मक होते. या चेतनेला जागृत करण्यासाठी ‘दृष्टी संपन्न अभिनय’ अभिनय प्रक्रियेचा मुख्य भाग! म्हणजे पर्पज याला आपण हेतू, ध्येय असे म्हणतो, तर माझ्या अभिनयाला हेतू असणे, ध्येयं असणे आवश्यक आहे.

सहसा अभिनेत्री, अभिनेता यांचा, अभिनयातून मनोरंजन कसे होईल याकडे कल असतो. त्यामुळे असे कलाकारही प्रासंगिक विनोद, अंगिक हालचाली, टाइमिंग या स्वतःच्या कौशल्यांवर भर देतात. मान्य ही कौशल्य ही उपयुक्त, पण केवळ या कौशल्याने अभिनय होत नाही.

नाटकात अभिनयाची पराकाष्ठा चिंतन व अनुभवांतून गाठली जाते. म्हणून अभिनयात चिंतन प्रक्रिया ही शारीरिक हालचाली किंवा चेहर्‍याचे व्यंगात्मक भाव निर्माण करण्यापलीकडची आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या अभिनय प्रक्रियेत अभिनेत्री व अभिनेत्याच्या शरीराला (बॉडी) महत्त्व आहे…कलाकाराच्या शरीराला काय वेगवेगळे आकार आहेत, शेप आहेत. यातून अभिनयाचा एक नवीन पैलू या प्रक्रियेत समजला. कलात्मक आकृती, आखीव-रेखीव रचना, मुद्रा यांद्वारे अभिव्यक्त होऊन संहिता (तत्व) आणि शरीराचा समन्वय साधणे हे अभिनयाचे सौंदर्यशास्त्र आहे.

अभिनेता, अभिनेत्री सतत स्वतःच्या अभिनयातून एक एक साचा निर्माण करत असतात आणि तो तोडतातही म्हणून, माझ्यासाठी अभिनय म्हणजे लर्न आणि अनलर्न करण्याची प्रक्रिया आहे..

इथे एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की, मानवीमूल्यांना संवेदनशील दृष्टीने पाहणे कलाकारासाठी अनिवार्य आहे. या दृष्टीशिवाय कलाकाराचा अभिनय फक्त एक दिखावा आहे. यासाठी अभिनय हा रंगमंचावर करायचा, जीवनात नाही..जीवन प्रवाही आहे ते जगायचे आणि नाटकातून जीवन जगण्याचा दृष्टीकोन द्यायचा हे अभिनयाचे- अभिव्यक्तीचे मूल्य थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्वाने माझ्या आत रुजवले.
-(सायली पावसकर – रंगकर्मी)

Saturday, June 15, 2019

Sunday, June 9, 2019

कलात्मक रूहें!


आपलं महानगर 

९ जून  २०१९



जागतिकीकरण प्रत्येक मूल्य नष्ट करत आहे. परंतु, येथे आपण फक्त एक सामान्य माणूस नाही, कलात्मक कौशल्याने कुशल आहात. आपल्या स्वत:च्या या ताकदीवर टिकून राहा आणि ओळख कायम ठेवून प्रस्ताव स्वीकारा. रांगत नव्हे, तर पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या ‘कलात्मक मूल्यांवर’ टिकून राहा. प्रारंभिक धक्का दिल्यानंतरही बाजार आपले मत ऐकत आहे. बस सुरुवातीच्या धक्क्यांमध्ये आपली पतवार धरून ठेवायची आहे.

समर्पक कलाकार आहे. कलेसाठी जीवन समर्पित केले आहे. माझे शरीर लय, ताल घेऊन एका पात्राचा उपयुक्त आकार घेण्यास सदैव तत्पर आहे. माझ्या आवाजाला सतत अभ्यासाने पैलू पाडले आहे. अभिनय करताना चारित्र्याचा आवाज धारण करण्यामध्ये पारंगत आहे. भावमुद्रांना साधनेतून साध्य केले आहे. प्रत्येक पात्राच्या भावाला जिवंत करण्यास प्रवीण आहे. विचारांचा साधक आहे. तत्वाला एका व्यक्तिगत जीवनात जगतो. कलेची संकल्पना, त्याच्या निर्मितीच्या मूळ लक्ष्यापासून कधीच ध्यान भरकटवत नाही.. आणि म्हणूनच ‘कला ती जी मनुष्याला मनुष्य बनवते’ या मूळ ध्येयाला गाठण्यासाठी प्रतिबद्ध आहे किंवा असं म्हणायला हरकत नाही की हठयोगमध्ये पारंगत आहे. चेतनेच्या चैतन्य ब्रह्म सृजन स्वरूपामध्ये सिद्धहस्त सृजनकार आहे.

कलेची समर्पकता मला आध्यात्मिक संतुष्टी देते. पण माझ्या आसपासच्या सांसारिक गोष्टी मला प्रत्येक क्षणी निरर्थक करतात. समाज आणि बाजार कलेची एक विकली जाणारी छबी विकतात. नाचणे, गाणे, हतप्रभ करणे, भावविभोर करणे, हिंसेतून वीररस भरणे, गलथान पद्धतीने हसणे, अतिभावूक होऊन रडवणार्‍या कुशल, तार्किक विचारशून्य शरीरांना बाजार कलाकार म्हणून प्रस्थापित करतो आणि काही लोक जे विचार करतात त्यांना खरेदी करून नफा कमवत आहे. कलेच्या नावावर जगणार्‍या शरीरांचे पोट इतके वाढवतो की, ते स्टारपासून सुपरस्टार, सदीचा महानायक ते सुपर से उपर आणि फैंटाबुलस फैनटेसीपर्यंत काय काय होतात; पण त्यांच्या मुखातून हे कधी ऐकले नाही की माझे पोट भरले आहे. कारण बाजार गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर, लालसा वाढवण्यासाठी असतो.

यू डोंट नीड इट, बट यू वॉण्ट टू हॅव इट!
खरेदी आणि विक्रीच्या या काळात कलाकाराने काय करावे? कलाकाराने त्याच्या ‘व्यक्तिमत्वाची मूल्य स्वच्छ करत त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि दृष्टीकोन वाढवणे अनिवार्य आहे. केवळ भावविश्वात विहार करण्याऐवजी, प्रखर बुद्धीने कलेच्या नावाने येणार्‍या प्रस्तावांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. हा देवाणघेवाणीचा काळ आहे. कलाकाराला प्रत्येक परिस्थितीत आपली ‘ओळख’ जिवंत ठेवावी लागणार आहे. ‘ओळखी’ला प्रसिद्धी हा पर्याय नाही. ओळख म्हणजे आपले ‘कलात्मक मूल्य’ आणि प्रसिद्धी म्हणजे आपल्या कलात्मक प्रतिभेची जन स्वीकार्यता. म्हणून ओळख म्हणजे ‘कलात्मक मूल्य’ व प्रसिद्धी म्हणजे कलात्मक प्रतिभेची जन स्वीकृती. जागतिकीकरण प्रत्येक मूल्य नष्ट करत आहे. परंतु, येथे आपण फक्त एक सामान्य माणूस नाही, कलात्मक कौशल्याने कुशल आहात. आपल्या स्वत:च्या या ताकदीवर टिकून राहा आणि ओळख कायम ठेवून प्रस्ताव स्वीकारा. रांगत नव्हे, तर पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या ‘कलात्मक मूल्यांवर’ टिकून राहा … प्रारंभिक धक्का दिल्यानंतरही बाजार आपले मत ऐकत आहे. बस सुरुवातीच्या धक्क्यांमध्ये आपली पतवार धरून ठेवायची आहे.


परंतु, बाजार आपल्या ‘कलात्मक मूल्यांचा’ सतत विध्वंस करत आहे. बाजाराला कलेची नाही वस्तूची गरज आहे. बाजार शरीराच्या मादकतेला भाववस्तू बनवून नफा मिळवत आहे. म्हणूनच अर्थच्या नावावरून आपल्याला भ्रमित केले जाते. सुरुवातीला पैसे नाही देत नंतर भरपूर पैसे देतात. या पैशांची चमक आपल्या दृष्टीस आंधळे करते. याच्या पलीकडे जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला या ओळीने प्रेरित करा. ‘एक माशी गुळाच्या ढेपेवर बसली, त्या ढेपेलाच ती चिटकली, गूळ वितळला ती त्यात रुतली, फसली आणि तिला स्वतःचा जीव गमवावा लागला’.

प्रसिद्धी नाही मिळाली तर त्याची खंत आणि मिळाली तर जगणे बेहाल.. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रसिद्धी ही तुमच्या कलात्मक कौशल्यांना मिळाली आहे आणि तुमच्या कलात्मक कौशल्यांचा आधार तुमची कलात्मक मूल्ये असतात. आपल्या यशाला वैयक्तिक यशापर्यंत मर्यादित करू नका, उलट आपली ‘कलात्मक मूल्ये’ अर्पित करून, कलेच्या मूळ ध्येयाला साध्य करणार्‍या साधनेच्या रुपात पहा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला ‘व्यक्तिनिष्ठ’ करण्याऐवजी ‘सार्वभौमिक’ स्वरूपात आपल्या जीवनाला समर्पित करा.

कलात्मक रूहें
समाधान के शोध में ,

उछलती, मचलती, डूबती

भावनाओं की तड़पती बहती धारा,

अपने तत्व की तलाश में

उलझता सुलझता मन

उष्णता, शीतलता के बीच

झूमती, डोलती काया

अपने होने, ना होने के समर में

अंदर, बाहर झांकते बिम्ब

चेतना के सूर्य का आत्मोदय

तत्व के यथार्थ को साधती

सिद्धहस्त करती सिद्धियाँ

अपने नाद को अनाहद में

परिवर्तित करती स्वरलहरियां

अपने कलात्मक सत्व को सुनती

गाती, गुनगुनाती कलात्मक रूहें !

-मंजुल भारद्वाज ( रंगचिंतक व तत्वज्ञ )

Sunday, June 2, 2019

अभिनयाचा एक मुख्य पैलू : स्पर्श

आपलं महानगर 
२ जून  २०१९


हाच तो "स्पर्श" जो मायेचा, विश्वासाचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, सद्विवेकाचा, चेतना निर्माण करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा असतो, जी संवेदना ‘कला’च निर्माण करू शकते. हा स्पर्श ‘माणुसकीचा’ असतो. जे हे रोमांच आपण रंगमंचावर अनुभवतो तेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्येक नात्यात अनुभवण्यास मिळाले तर जीवन किती सुंदर होऊन जाते! हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही.


मानवीय संवेदनांमधील सर्वात सुंदर आणि मोहक भावना म्हणजे स्पर्श!
या स्पर्शाने कितीतरी आयुष्ये बहरली, मोहरली, फळास आली, सार्थकी लागली.
स्पर्श, मग तो त्वचेचा असो वा नजरेचा
भावनिक असो वा चेतनेचा…

स्पर्श ही एक अशी भावना आहे, जी अनुभवण्यासाठी उत्सुकता असते, मात्र त्याविषयी फारसे खुलून बोलले जात नाही. व्यावहारिक जीवनात विविध स्पर्श एकमेकांच्या वाट्याला येत असतात; पण आजही स्पर्श या संज्ञेविषयी योग्य ती जाणीव व जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. मी अशा सृजनात्मक, सात्विक स्पर्शाविषयी बोलत आहे जो स्पर्श प्रत्येक कलाकार अनुभवण्यासाठी अक्षरशः उतावीळ असतो, उत्सुक असतो, तो स्पर्श त्याला एक वेगळी ताकद देणार असतो आणि तो म्हणजे आपल्या रंगभूमीचा स्पर्श!!

नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आई जशी आपल्या बालकाला कवेत घेण्यास उत्सुक असते तसेच काहीसे नाते आणि उत्सुकता पहिल्यांदा रंगमंचावर येताना असते, नव्हे ती दर प्रयोगांगणिक असतेच! कलाकार आणि रंगभूमीचं नातं हे स्पर्शाने खुलते, वाढत जाते. रंगभूमी ज्या मायेने कवेत घेते, कलाकार बागडायला मोकळा!


ही सगळी प्रस्तावना मांडण्याचे कारण असे की आपण आपल्याच विश्वात असतो. मात्र ते विश्व अलौकिक जगाशी कमी व्यावहारिक जगाशीच जास्त जोडलेले असते आणि व्यवहार आपल्या संवेदना, भावना, नाजूक क्षण कधी आणि कसे ओरबाडतो हे बर्‍याचदा समजतही नाही. आपण ठरवल्याप्रमाणे साचेबद्ध आयुष्य जगत राहतो; पण एकत्र जगण्याचा अभ्यास करून का जगू नये… एक भूमिका बजावताना दुसरी भूमिका, जबाबदारी राहून जात असेल तर थोडं थांबावं, विचार करावा आणि मग पुढे जावं, थोडं थांबल्याने काही नुकसान होत नाही उलट तो काळ, ते क्षण दोघेही सोबत जगत जातात. आयुष्यात अनेक सुखद क्षण डोकावून जातात; पण त्यांचे स्वागत कसे करावे हे मात्र कोणत्याच पुस्तकात कधी सांगितले जात नाही, हे महत्त्वाचे क्षण हातचे सुटू नये यासाठी व्यवहार आणि संवेदना यांची सांगड कायमस्वरूपी घालण्यासाठी उपयोगी येते माणुसकीची प्रक्रिया! जी हळूवार धाग्यातून मायेच्या स्पर्शाची पखरणही करते आणि मुळात त्याची जाणीव आपल्यापर्यंत पोहचते.

“थिएटर ऑफ रेलेवन्स” च्या जीवननाट्य प्रक्रियेत मी एक कलाकार म्हणून नाते, स्पर्श, संवाद, संवेदना, व्हायब्रेशन्स याविषयी अभ्यासत आणि अनुभवत असताना ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ जाणिवांविषयी देखील अनुभवू लागले आणि या जाणिवा ‘कलाकार’ म्हणून वाढत असताना, ‘माणूस’ म्हणून प्रत्येक नात्यातही बहरत गेल्या.

दर प्रयोगाआधी रंगमंचावर फिरून आणि आलाप प्रक्रियेने रंगमंच आणि कलाकाराचे नाते घट्ट केले जाते. त्याचप्रमाणे दुरावलेल्या नात्यांनाही वेळ, संवाद, साधनेचे खतपाणी घालून भक्कम करता येते हे नव्याने समजले. प्रत्येक प्रयोगाआधी तर मंचाच्या मध्यभागी सर्व कलाकार गोलाकार फिरून आणि मग झोपून आलाप आणि साधना करत सकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण करताना मी अनुभवले आहे आणि त्यानंतरचा प्रयोग हा नेहमीच घट्ट बांधणीने एकत्र रचनात्मक स्वरूपात सादर होतो. त्यात शिस्त असते, सावधानी असते, अलर्टनेस असतो आणि मुख्य म्हणजे एका अदृश्य तरंगाने सर्व कलाकार एकमेकांशी आणि लेखक-दिग्दर्शकाशी, रंगभूमीशी आणि मुख्यतः प्रेक्षकांशी व्हायब्रेशनली जोडले जातात. मला या प्रक्रियेचे हेच अप्रूप वाटते की जसे कलाकाराचे मंचाशी नाते घट्ट होत जाते तसा तो स्वतःच्याही अधिक जवळ जातो आणि ही प्रक्रिया मानवीय संवेदना भक्कम करून मानवी नातीही घट्ट विणत जाते.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित अनहद नाद- Unheard Sounds Of Universe नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगभूमीच्या स्पर्शाची एक ओजस्वी अनुभूती मी अनुभवली. आजही तो क्षण आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. असे अनुभव उत्तम कलाकृती सादर होत असताना प्रत्येक संवेदनशील कलाकाराला येतात आणि येत असावेत…एक अशी धुंदी, एक अशी टाळी लागते सादरीकरणा दरम्यान की आपण तिथे नसतोच, एका वेगळ्याच विश्वात फिरून येतो जे आपण कधी पाहिले वा अनुभवलेही नसते, तो क्षण फक्त माझा आणि त्या कलाकृतीचा होता यालाच एकरूप होणं म्हणत असावेत आणि यात महत्त्वाचा त्रिकोण हा जोडता येतो की कलाकार रंगमंचावर असताना जे रोमांच अनुभवतो ते फक्त त्याच्यापुरतेच सीमित नसतात तेच व्हायब्रेशन्स त्याच क्षणी प्रेक्षकांपर्यंतही पोहचत असतात आणि म्हणूनच ते या सुखद क्षणांचे साक्षीदार होतात आणि अनुभूतीचे समाधान त्यांच्यापर्यंतही पोहचते. हीच आहे कलेची ताकद, कलेतील कलात्मकता जी अदृश्य स्वरूपातही आपली दृश्य अनुभूती देते!!

या तत्वांशी संबंधित रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित बोध ही कविता सोबत जोडत आहे.

बोध 
-मंजुल भारद्वाज 
स्पर्श, गंध, भाव 
है जीवन बोध
मीत, प्रीत, रीत
है संसार बोध
आकर्षक, मोहक, अदा
है सौन्दर्य बोध 
चाहत, सहवास, त्याग 
है प्रेम बोध 
ज्ञान, संज्ञान, विज्ञान 
है दृष्टि बोध 
दृष्टि जैसी सृष्टि
है संकल्प बोध 
सत्य, निष्ठा, न्याय
है मानवता बोध
जड़,चेतन,जन्म 
है सृजन बोध 
निरिक्षण, धारण, सम्प्रेष्ण 
है कला बोध 
अर्पण, समर्पण, तर्पण 
है मुक्ति बोध!

मुळात हे रेझोनेशन, हे तरंग व त्याचा शोध हा एक वैज्ञानिक भाग आहे. या वैज्ञानिक तत्वाला थिएटर ऑफ रेलेवन्स मानवीय तत्वांशी जोडतं. जसा “अनहद नाद” कोणत्याही दोन वस्तूंच्या घर्षणाशिवाय निर्माण होतो जो अदृश्य वा अमूर्त स्वरूपात जाणवतो, तसा हा “अनहद स्पर्श” कोणत्याही स्पर्शाशिवाय शिवून जातो, आपल्याशी संवाद करून जातो. रंध्रारंध्रातून रोमांच उभे करतो आणि आपण इथे असूनही या जगात नसतो!

हाच तो “स्पर्श” जो मायेचा, विश्वासाचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, सद्विवेकाचा, चेतना निर्माण करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा असतो जी संवेदना ‘कला’च निर्माण करू शकते. हा स्पर्श ‘माणुसकीचा’ असतो. जे हे रोमांच आपण रंगमंचावर अनुभवतो तेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्येक नात्यात अनुभवण्यास मिळाले तर जीवन किती सुंदर होऊन जाते! हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही. ते सत्व, ती सात्विकता तेव्हाच निर्माण होते जेव्हा समर्पण असते, विश्वास असतो, आपुलकी असते! आज या भावना, संवेदना, जाणिवा कुठेतरी हरवत जात आहेत त्या जपणं हे एक ‘कलाकार’ आणि एक ‘माणूस’ म्हणून आपली जबाबदारी आहे.

चार वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर निर्माण झालेल्या अनहद नाद – Unheard Sounds Of Universe या नाटकाच्या माध्यमातून कलात्मक मानवीय तरंग रेझोनेट करण्यात आले.

दादर येथील श्री शिवाजी नाट्य मंदिरात सकाळ, दुपार, संध्याकाळ या नाटकाचे प्रयोग झाले आणि त्यातून अशा वैचारिक नाटकांची चर्चा होण्यास सुरुवात झाली आणि त्यातून रंगभूमीचा तत्वांशी संबंध आहे या विचाराचे पुनर्मंथन सुरू झाले.


‘अनहद नाद’चे कलात्मक स्पर्श, तरंग, व्हायब्रेशन्स नाट्यगृहापासून प्रेक्षकांना आणि कलाकारांपासून ते आपल्या रंगभूमीला अधिकाधिक समृद्ध करत आहेत.


-योगिनी चौक (रंगकर्मी)