Pages

Thursday, October 1, 2020

सांस्कृतिक सृजनकारच मुक्ती देऊ शकतात - मंजुल भारद्वाज

 सांस्कृतिक सृजनकारच मुक्ती देऊ शकतात - मंजुल भारद्वाज 

सामना
१ ऑक्टोबर २०२०





संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास आजचे एकाधिकारवादी तंत्रज्ञान सज्ज झाले आहे. अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. कोरोना महामारी काळात इस्पितळे निर्माण करण्याऐवजी भलत्याच गोष्टी करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱया मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

देश आणि जग आज सांस्कृतिक रसातळाला गेले आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर संप्रेषण माध्यमात संपूर्ण विश्व ‘लाईव्ह’ आहे, परंतु शोकांतिका ही आहे की, तंत्रज्ञान लाइव्ह असले तरी मनुष्य मृतवत झालेला आहे. मृत जगाला तांत्रिक संप्रेषण लाईव्ह करत आहे. किती कमालीचा विकास आहे हा! व्यक्ती, कुटुंब, समाज, देश आणि जग ‘मृतावस्थेत’ व तंत्रज्ञान लाईव्ह!

हो, हाडामांसाचे पुतळे श्वास घेत आहेत, परंतु ते जिवंत आहेत का? जे श्वास घेत आहेत, त्यांची अवस्था काय आहे? घरामध्ये कैद असलेल्या, भूक, भय आणि भ्रमाच्या जाळ्यात फसलेल्या लोकांना जिवंत म्हणता येईल का? कोरोना महामारीमुळे लाखो लोकांना मृत्यू अकाली कवेत घेतो आहे. अनोळखी भीतीने आज जग खोल गर्तेत गेले आहे आणि तंत्रज्ञान तरीही सध्याच्या जगाला लाईव्ह म्हणत आहे. आहे ना विकासाचा कमळासारखा फुललेला चेहरा?

खरं म्हणजे जिवंत असण्याचा अर्थ आहे भयमुक्त असणे, विचारशील असणे. विकारांऐवजी विवेकसंमत असणे. आपले विचार धैर्याने व्यक्त करताना मानवी कल्याणासाठी सत्याचा शोध घेणे. मात्र एकविसाव्या शतकात जीवन व्यवहाराच्या सर्व सोयीसुविधा प्राप्त करूनही जगाची परिस्थिती अशी का झाली? या परिस्थितीच्या मुळाशी आहे लालसा, वर्चस्व आणि एकाधिकारासाठी जागतिकीकरणाच्या नावावर मनुष्याची ‘वस्तू’ करण्याची प्रक्रिया, जी मनुष्याला केवळ एक उपभोगाची सामग्री बनवत आहे. त्याच्या खरेदी-विक्रीचे विनाशकारी षडयंत्र रचले गेले आहे. आता यालाच ‘विकास’, ‘आधुनिकता’ असे गोंडस नाव दिले जात आहे.

अवघ्या 30 वर्षांत लाईव्ह तांत्रिक संप्रेषणाने अशी पिढी तयार केली आहे की, जी सारासार विचार करणे विसरली आहे. म्हणजेच मनुष्य आणि प्राणी यांच्यातील फरकच या प्रगतीने पुसून टाकला आहे. वास्तविक प्राण्यांपासून माणूस वेगळा ठरतो तो त्याच्या ‘विचार करण्याच्या क्षमते’मुळे! मात्र विचार करण्याची क्षमता हरवून सध्याच्या माणसाने केवळ प्राणी बनणे स्वीकारले. प्राणी असण्याचा अर्थ आहे की, कोणी इतर आपले सर्व निर्णय घेणार. ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहताना, मोबाईलवर भ्रमण करताना इंटरनेटच्या माध्यमातून आपले जीवन व्यवहार करणारे जग विचार करणे विसरून गेले आणि एकाधिकारशाहीच्या हाती सोपवले गेले.

एकाधिकारवादाने भ्रम निर्माण करून जगाला आपल्या मुठीत ठेवले. आता एकाधिकारशाही जगाला आपल्या मुठीत घेऊन हसत खेळत तांत्रिक संप्रेषणाने ‘लाईव्ह लाईव्ह’ खेळ खेळते. एकाधिकारवादाचा अर्थ आहे विविधतेचा नाश! विविधतेचा नाश म्हणजे प्रकृतीला काबीज करण्याचे धाडस. त्याच धाडसाचे आज प्रकृती उत्तर देत आहे. मनुष्याला जन्म देणारी, संगोपन करणारी प्रकृती आज मनुष्याविरुद्ध उभी राहून मनुष्याला गिळंकृत करीत आहे. यात सर्वात आधी तळागाळातील लोकांचा बळी जात आहे, परंतु प्रकृती एकाधिकारशाहीपर्यंत पोहोचत आहे.

मनुष्याच्या या ऱहासाचे कारण आहे त्याची सांस्कृतिक चेतना मृत होणे. अर्थात कोणी कितीही बलशाली, सर्वज्ञ असो, जेव्हा जेव्हा त्याची सांस्कृतिक चेतना भ्रमित झाली तेव्हा तो संपला हा इतिहास आहे. सांस्कृतिक चेतना ही अशी चेतना आहे, जी मनुष्याला आंतरिक आणि बाह्य अधिपत्यापासून मुक्त करून त्याच्या मूल्यांना उक्रांतीच्या मार्गावर नेण्यास उत्प्रेरित करते आणि प्रकृतीसोबत जगताना मनुष्याचे एक स्वतंत्र स्वायत्त अस्तित्व घडवते. मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास आजचे एकाधिकारवादी तंत्रज्ञान सज्ज झाले आहे. अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील. कोरोना महामारी काळात इस्पितळे निर्माण करण्याऐवजी भलत्याच गोष्टी करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. इस्पितळे बांधण्याऐवजी धार्मिक स्थळे उभारण्याचा आटापिटा केला जात आहे. जनतेच्या आध्यात्मिक संवेदनांशी खेळ केला जात आहे.

मनुष्याला निरंतर परिवर्तन हवे असते. परिवर्तनाची त्याची आस नैसर्गिक आहे. प्रकृतीदेखील निरंतर परावर्तित होत असते. मनुष्यासाठी आवश्यक आहे परिवर्तनाला समजणे. परिवर्तन ही एक अशी वर्तन प्रक्रिया आहे, जी मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करते.

मागील 28 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षकांच्या सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 28 वर्षांपासून जातीय मुद्दय़ावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बालमजुरीवर ‘मेरा बचपन’ अशी, कौटुंबिक हिंसेवर ‘द्वंद्व’, ‘मैं औरत हूँ’, लिंगनिदान या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर ‘बी-7’ अशी नाटके रंगमंचावर आणली. मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधात ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी ‘गर्भ’, शेतकऱयांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱया विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारे ‘न्याय के भंवर में भंवरी’, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगती’ अशा नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे! आजच्या या कठीण काळात ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने सांस्कृतिक सृजनकार घडवण्याचा निर्धार केला आहे! समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱया मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.




(लेखक थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय़सिद्धांताचे संस्थापक आहेत)

Reference:- https://www.saamana.com/article-by-manjul-bhardwaj-2/?fbclid=IwAR1Fwc55R9lLU_6Li8vmtoi44zTFbXgL00947tvSFMDZAEODsmpXmGTcSBY


Sunday, June 28, 2020

रसिक स्पेशल:राजनैतिक प्रास्ताविक रचणारी कविता !

दिव्य मराठी ( रसिक )
२८ जून २०२०

रसिक स्पेशल:राजनैतिक प्रास्ताविक रचणारी कविता !
सायली पावसकर


कोरोना या आपत्ती सोबत लढताना व्यवस्थेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. आता या त्रुटींना दुर्लक्षित करायचे की हेच महत्वाचे मुद्दे म्हणून यांना मांडायचे, हा कळीचा मुद्दा आहे. अशा काळात कलाकार, नाटककार आणि साहित्यिक यांची मुख्य भूमिका येते, जिथे ते आपल्या कलेला माध्यम बनवतील व आपल्या साहित्याच्या रचनेतून हेतुपूर्वक मूलभूत प्रश्न, मौलिक अधिकार आणि उद्दीष्टांना मांडतील. कलासत्वाला मानवतेसाठी व विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत विचार म्हणून काळासोबत लढतो. हीच भूमिका घेतली रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी.

आपत्ती माणसाला एक नवीन ओळख देते. आज संपूर्ण विश्वासमोर निसर्गात केलेल्या हस्तक्षेपाचे परिणाम स्वरूप 'कोरोना', या आपत्तीने विश्वात एकूणच मोठे आर्थिक, सामाजिक, राजनैतिक आणि मनोवैज्ञानिक पडसाद उमटत आहेत. या आपत्तीमुळे समाजाचा, मानवी स्वभावाचा आणि व्यवस्थेचा खरा चेहरा समोर आला आहे, ही अशी स्थिती सहसा उघड उघड समोर येत नाही. संपूर्ण जगाच्या इतिहासातील कदाचित पहिलीच घटना असेल, जिथे सत्ता, संविधान, व्यवस्था, सामाजिक अवस्था, मानवीप्रवृत्ती याचे विभिन्न पैलू समोर येत आहेत. 

ही आपत्ती कोणताच भेद न करता प्रत्येकाला भेडसावत आहे. जीवनाला वाचवण्यासाठीचा संघर्ष प्रत्येकाचा निर्वाकार सुरू आहे, समाजातील प्रत्येकजण जबाबदारीने वागत आहे. आरोग्य कर्मचारी जीवनाला वाचवण्यासाठी कार्यरत आहे. सेवाभावी संस्था गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर आहेत. पण मानवी मूलभूत अधिकारांसाठी कोण लढतंय? उद्भवलेल्या स्थितीच्या मुळाशी कोण जात आहे? तिला तटस्थपणे कोण विश्लेषित करत आहे? उद्भवलेल्या आपत्तीतून पुन्हा पूर्ववत होण्यासाठी खरी कसब लागते. आज आरोग्यसेवा आणि कल्याणकारी राज्यसंस्था ही मौल्यवान संसाधने आहेत व त्यांची अनिवार्यता अशा आपत्तीच्या काळात सिद्ध होते. आपण स्वतःहुन ओढवून घेतलेला, मानवतेला नष्ट करणारा जागतिकीकरणाचा काळ, आपल्यावरच आघात करत आहे. फॅसिस्ट प्रवृत्तीचे शासन, लोकशाहीचे झुंडशाहीत झालेले रूपांतर, सतत धार्मिक रंग देऊन समाजाला भेदणारी,भांडवलशाहीची मीडिया, समाज संवेदनहीन झाला असताना, "माणुसकी" शेवटचा श्वास घेत आहे. या आपत्ती सोबत लढताना व्यवस्थेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. आता या त्रुटींना दुर्लक्षित करायचे की हेच महत्वाचे मुद्दे म्हणून यांना मांडायचे, हा कळीचा मुद्दा आहे. 

अशा काळात कलाकार, नाटककार आणि साहित्यिक यांची मुख्य भूमिका येते, जिथे ते आपल्या कलेला माध्यम बनवतील व आपल्या साहित्याच्या रचनेतून हेतुपूर्वक मूलभूत प्रश्न, मौलिक अधिकार आणि उद्दीष्टांना मांडतील. कलासत्वाला मानवतेसाठी व विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत विचार म्हणून काळासोबत लढतो. हीच भूमिका घेतली रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी.

मजुरांच्या सोबत चाललेल्या जीवघेण्या प्रकरणा बद्दल आज प्रत्येकाला सहानुभूती वाटते आहे. आजच्या स्थितीत ही, मजुरांचे मुद्दे, प्रश्न विकासाच्या बासनात गुंडाळलेले आहेत. आधीच मजुरांची ही अवस्था, त्यात त्यांच्या मौलिक अधिकारांचे हनन, यातून स्पष्ट होते की, मजुरांचे यंत्रणेतील स्थान काय ? हा रोग उच्च व मध्यमवर्गातून शोषित-गरीब वर्गांत पसरला हे सत्य नाकारता येणार नाही. तरीही फरपट मजुरांची, गरिबांची होत आहे. एकंदरीत हे स्पष्ट आहे की, नवउदारमतवादी यंत्रणेत, राजकीय परिघात आणि समाजात मजुरांसाठी काही संवेदना उरल्या नाहीत. कारण राजकीय कोष असूनही मजूर पायी चालत जाण्यास विवश आहेत. धान्य कोठारे भरलेली असूनही उपासमार व भूकबळी जात आहेत. जागतिकीकरणाचे हे विदारक सत्य आहे. लॉकडाउन मध्ये पुरोगामी, बुद्धिवादी, परिवर्तन वादी, मध्यमवर्ग सगळे घरी आहेत. पण हे मजूर मात्र वाट मिळेल, त्या दिशेने चालत आहेत, भर उन्हात अन्न पाण्याविना. कारण ते सरकारच्या अटीवर जगायला तयार नाहीत. त्यांना जनावरांसारखे जगायचं नाही.ते नवीन मार्ग शोधत आहेत आणि हे त्यांचे सविज्ञ आंदोलन आहे. ही वेगळी दृष्टी त्यांच्या काव्य रचनांतून व्यक्त होत आहे. जिथे थाळ्या बडवून, दिवे पेटवून मध्यमवर्ग समाजाने मान्य केले होते की आता सगळे पूर्ववत होईल, तिथे सरकारला मजुरांनी हादरवून सोडले. उत्तरदायित्व स्वीकारण्यास भाग पाडले. मजुरांच्या सत्याग्रहाने जीवन संघर्षाची मशाल पेटवली.मृतावस्थेत असलेल्या लोकशाहीला जिवंत केले. 

मंजुल भारद्वाज म्हणतात, 

यह अंतिम व्यक्ति लोकतंत्र के लिए

लड़ रहा है

यह गांधी की तरह

अपनी विवशता को 

अपना हथियार बना रहा है

शायद गांधी को पहले से पता था

उसके लोकतंत्र और विवेक का

वारिसदार अंतिम व्यक्ति होगा !

गांधींनी म्हंटले होते, खेड्यांकडे चला ! हे तत्व आज मजूर सार्थक करत आहेत. देशाची खरी प्रगती ही ग्रामीण विकासाच्या जोरावर होईल हा गांधींचा विचार. मजुरांच्या या सत्याग्रहाने आत्मनिर्भरतेचे खरे मूळ हे गावांमध्ये आहे हे निदर्शनास आणून दिले. (म्हणूनच सगळे संकटसमयी गावांकडे निघालेत). गावांमध्ये शाश्वत विकासाची पाळंमुळं रुजवली असती तर मजुरांना आपली गावे, घरे व परिवार सोडून परजीवी शहरांत येण्याची आवश्यकताच नव्हती. 

काव्य रचनेतील अंतिम व्यक्ती गांधींचा शेवटचा (तळागाळातील) व्यक्ती, कार्ल मार्क्सचा सर्वहारा आणि आंबेडकरांचा शोषित व्यक्ती आहे. गांधींनी याच शेवटच्या व्यक्तीला राजनैतिक प्रक्रियेसोबत जोडले होते व भारतीय लोकशाहीला सुदृढ केले होते. आंबेडकरांनी शोषितांच्या अन्यायाला भेदले. जन्माच्या संयोगाला आव्हान दिले व  यंत्रणेत सहभागी होण्याचा समान हक्क मिळवून दिला. कार्लमार्क्सने वर्गसंघर्षाची चौकट मोडून सर्वहाराची सत्ता स्थापन करण्याचे सूत्र दिले. आजच्या काळात जिथे बाजारवाद, जागतिकीकरण लोकतंत्राच्या मूल्यांना ध्वस्त करत आहे, जिथे समाज संवेदनहीन होऊन टाळ्या व थाळ्या बडवत आहे, जिथे लोकप्रतिनिधी मूलभूत, कल्याणकारी सेवांच्या पूर्ततेऐवजी केवळ घोषणाबाजी करत आहे तिथे मजूर प्रतिरोध करीत, गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर चालत आहेत. याच विचाराला मांडत रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या सारखे रचनाकार आपल्या रचनेतून न्याय, समता, समानतेचे मूल्य रुजवून नवीन राजनैतिक सुत्रपात प्रस्थापित करीत आहेत.  

या मुद्याचे आवर्जून विश्लेषण व्हावे, ज्या मजुरांच्या नावे कित्तीतरी मजदूर संघटना व कामगार संघटना उभ्या राहिल्या आहेत, त्या मजुरांच्यात ही दृष्टी का नाही जागवू शकले. मजुरांना त्यांच्या ताकदीची जाणीव का नाही करून दिली. मजदूर संघटना किंवा युनियन मालकांशी व सरकार सोबत लढते, पेन्शन व हक्क यासाठी भांडते. पायी चालत जाण्याचा हा मजदूर सत्याग्रह कोणी पेटवला नाही.घराकडे जाण्याची त्यांची प्रतिबद्धता अस्तित्वाची व सुरक्षिततेची प्राथमिकता होती. त्यासाठीच हे मजूर  कुठल्याही आंदोलनाशिवाय , मोर्चाशिवाय संघटित झाले. सत्य नेहमी कटू असते म्हणून सत्याला प्रश्नांच्या स्वरूपात मांडावे लागते,जे आजच्या घडीला गरजेचे आहे. आज व्यवस्थेमध्ये असलेल्या पोकळीचे प्रश्न मांडणे आवश्यक आहेत, कारण हे प्रश्न आता नाही सोडवले तर अजून भीषण स्वरूपात समोर येतील.या काव्य रचनांतून कवी आपणा सर्वांना विचारतो आहे की, या वास्तवात, न्याय-समतेच्या कलात्मक रंगकर्मात, मजुरांच्या संघर्षात आपण कुठे आहोत ? 

मंजुल भारद्वाज म्हणतात, 

मरे हुए लोकतंत्र को 

ज़िंदा कर गए

पैरों से बहते खून से

मज़दूर पूरे देश की सड़कों पर

इंकलाब लिख गए!

पायी चालणाऱ्या मजुरांनी बुद्धिजीवी - पुरोगाम्यांच्या गुर्मीला धाराशाई केले. नैतिक - सभ्य, सुसंस्कृत समाजाला मानवी संवेदनांची जाणीव करून दिली. मृत समाजाचा आत्मा जागा केला.घराच्या पिंजऱ्यात अडकलेल्या मनुष्याला मनुष्य असण्याची जाणीव करून दिली. या कवीच्या काव्य रचनांनी राजनैतिक सुत्रपात प्रस्थापित केले आहे. त्यावर आज समाज मार्गस्थ आहे. मजुरांच्या जीवन संघर्षाला पाहण्याची दृष्टी बदलली. मजूर संघटना व त्यांचे प्रतिनिधी या काव्यरचनातून आपले राजकीय धरातल विश्लेषित करीत आहेत. नाटककार - कलाकार प्रत्यक्षात मजुरांच्या प्रश्नांवर काय मार्ग काढावा यावर संवाद साधत आहेत. संपादक व पत्रकार मजुरांच्या मुद्यांना अग्रणी धरत आहेत. राजनैतिक कार्यकर्ते लोकशाहीची संकल्पना मांडताना या कवितांचा आधाराने संवाद सुरू करत आहेत. थोडक्यात जड झालेल्या समाजाचा स्टेट  ब्रेक झाला. रंगकर्म, कला आणि राजनीती यांचा थेट संबंध आहे.मुळात रंगकर्म मौलिकरित्या राजनैतिक कर्म आहे. सत्याग्रह आहे, सत्तेविरुद्ध प्रतिरोध आहे.विचारांना उद्वेलीत करण्यासाठी,अहिंसक मार्गाने केलेला सत्याग्रह जसे आजच्या घडीला मजूर करीत आहेत.राज्यव्यवस्था नीतीनियम बनवते व कला माणसाला माणूस बनवते. बाहेरील शत्रूला धारातीर्थी करणारे, सीमेवर आपल्या रक्ताची आहुती देणारे सैनिक व रक्तबंबाळ पावलांनी भारतीय लोकशाहीला बळकट करणारे, देशातील शत्रूला देशहिताचा पाठ पडवणारे, दमनकारी सत्तेला भिडणारे मजूर हे एकसमान आहेत. ही दृष्टी काव्यरचनांतून स्पष्ट होते आहे.

भारतीय राजनैतिक परिप्रेक्ष्यात या काव्यरचना खोलवर प्रभाव सोडत आहेत. ज्याने संविधानाची मूळ अजून भक्कम होतील हे निश्चित. परिवर्तनासाठी एक वैचारिक ठिणगीची आवश्यकता असते. ही वैचारिक ठिणगी "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्यसिद्धांत गेल्या 28 वर्षांपासून जनमानसात पेटवत आहे. आम्हा रंगकर्मींचा हा दृढ विश्वास आणि संकल्प आहे की अश्या ज्वलंत रचनांमधून सांस्कृतिक चेतना जागवत सांस्कृतिक क्रांतीचा नक्कीच उदय होईल !

Reference:-https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/sayali-pavaskar-rasik-article-poems-with-political-introductions-127452995.html?fbclid=IwAR1H7n17vQ2f076Y5HHsqpOA7zSGMoDBfYkBdHVktKKwLPJ4TZna3_0i2G8