मंजुल भारद्वाज नावाची नाट्यशाळा
मुकेश थळी
(दैनिक गोमंतक , पणजी, रविवार,२८ जून,२०२६)
थिएटर ऑफ रेलेवन्स ही संकल्पना घेऊन रंगकर्मी मंजुल भारद्वाज हे गेली 3 दशके देश आणि परदेशात नाटकं करत आहेत. अभिनेता, लेखक, फेसिलिटेटर, कवी असे हे बहुरंगी रसायन.
मंजुलची नाटके हल्लीच गोमंत विद्या निकेतनच्या पंचमवेद नाट्य महोत्सवात झाली. या महोत्सवाने एके काळी गाजत असलेल्या व मध्यंतरीच्या काळात किंचित गंज चढलेल्या मडगांवच्या नाट्य चळवळीला झळाळी चढवली. माझे सन्मित्र लेखक दत्ता दामोदर नायक यांनी यासाठी पुढाकार घेतला. कोटी रूपये मांडवीत प्रवाहीत करणाऱ्या कला अकादमीने यापासून शिकावे. मंजुलसारख्या रंगसाधकांचं मार्गदर्शन कार्यशाळेनिशी विद्यार्थ्यांना मिळालं तर बरं होईल. गोवा कोंकणी अकादेमीनेही नाट्यलेखनासंदर्भात होतकरू लेखकांना आधुनिक विचार-तंत्राविषयी अवगत करण्यासाठी मंजुलचा विचार करावा.
मंजुलची दृश्टी 'कलेसाठी कला' या सूत्रात अडकून पडली नाही. 'जीवनासाठी कला' असा विचार करीत असतानाच त्याच्याही नकळत 'ज्ञानासाठी कला' या तत्वाकडे तो झेपावला आहे. त्यातूनच त्यानं सिद्ध केलंय, 'कला कुणाची बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते.' बटीकपण नाकारत मंजुल म्हणतो, 'कलेनं मनोरंजनाच्या सीमा तोडून जीवन कसं जगलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे' म्हणजेच जीवन कसं जगावं याचं ज्ञान दिलं पाहिजे कलेने. तो फक्त सांगत नाही. त्याच्या प्रत्येक कार्यशाळेत हे सिध्द करतो. त्याची टीम भारदस्त उत्साही आहे. मंजुलने 16 हजार नाटकांत भूमिका केल्या आहेत. 28 नाटके लिहिली आहेत.
मंजुलची तीन पुस्तके आहेत. ग्रंथच म्हणा ना. थिएटर ऑफ रेलेवन्स हे पुस्तक हिंदी व इंग्रजीत आहे. ‘रंग कारवां’ हे नाटकांचं पुस्तक आहे. मडगांवचे रसिकाग्रणी मित्र मानसोपचारतज्ञ डॉ राजेंद्र हेगडे यांनी मला ही तीनही पुस्तके सप्रेम भेट म्हणून पाठवली त्यांचा मी ऋणी आहे. ऊसाच्या शेतात कोल्हा पडावा तसा मी त्यात चरू लागलो. नाटकाकडे कॅलायडोस्कोपीक मितींतून कोनातून पाहाणारा हा चिंतक नाटककार आहे. नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे. अभिनित मंचीत होताना नटांनी तिथल्या तिथं त्या क्षणी प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करायला हवं. ते नाटक. जीवनाच्या गुंतागुंतीविषयी, आयामांविषयी नाटकानं स्पष्टता द्यायला हवी, असं तो म्हणतो.
‘‘नाटक हे मुळात चेतना जागवणारे माध्यम आहे. सत्ताधाऱ्यांनी त्याला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत सीमित करण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक म्हणजे फक्त मनोरंजन हा संकुचित विचार आहे. खरी कला माणसाला माणूस होण्याचा बोध देते’’, असे मत मंजुलने व्यक्त केले आहे.
त्याच्या संस्थेने गेली ३४ वर्षे कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी निधीशिवाय, केवळ प्रेक्षकांच्या सहयोगाने जागतिक स्तरावर नाटक सादर केले आहे याचा मंजुलला अभिमान आहे. त्यांच्या टीम मेट रंगकर्मी अश्विनी नांदेडकर नाट्यसिद्धांताच्या कलात्मक प्रक्रियेबद्दल फार समर्पक शब्दात बोलतात.
कलिंग! कलिंग! कलिंग! जेव्हा मंजुल भारद्वाज 'सम्राट अशोक' या नाटकात अशोकाच्या भूमिकेत गर्जना करत रंगमंचावर प्रवेश करतात, तेव्हा सम्राट अशोकाच्या सामर्थ्याचा आणि गर्जनेचा हुंकार घुमतो. मी या प्रयोगाची तालीम पाहिली आहे, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या पात्राचा चढता आलेख पाहिला आहे, जो नवनवीन आयाम निर्माण करत अभिनयाचे अनेक मापदंड मोडतो. मी मराठी आणि हिंदी रंगमंचावर विविध नाटके पाहिली आहेत. सम्राट अशोकाचे हे पात्र मला आतापर्यंत नाटकांमध्ये पाहिलेल्या विविध कलाकारांच्या भूमिकांच्या खूप पलीकडे घेऊन जाते. त्यांच्या शरीराच्या, हातांच्या आणि पायांच्या तीक्ष्ण मुद्रा माझ्यातील अभिनेत्रीला चकित करतात.
आपल्या तत्त्वांवर विचारांवर ठाम राहून, जगाला सुंदर आणि मानवी बनवण्याच्या मंजुलच्या वचनबद्धतेची तीन दशके नाट्यकला क्षेत्रात शाश्वत चिन्हं उमटवणारी आहेत.
'थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे' प्रत्येक नाटक एक नवीन संकल्पना घेऊन येते. घटक आणि ध्येये हे त्याचे पायाभूत स्तंभ आहेत. कलाकार हे नाट्य घटक मोठ्या विश्वासाने आणि वचनबद्धतेने प्रेक्षकांसमोर सादर करतात.
'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' या नाट्यसिद्धांताची सुरुवात नाट्य-विचारक मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट १९९२ रोजी केली.
आपल्या नाट्य चळवळीच्या माध्यमातून, देशात आणि जगभरात पूर्ण कलात्मक निष्ठेने हे जाणीवपूर्वक कलात्मक कार्य चालू आहे.
बदलाला प्रेरणा देत, मंजुलच्या गटाने गेल्या २९ वर्षांपासून, शासकीय, अशासकीय, कॉर्पोरेट निधी किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अनुदानाशिवाय, जागतिक स्तरावर सातत्याने एक असे सार्वजनिक व्यासपीठ साकारले आहे. कलात्मक संवादाच्या माध्यमातून ते मानवतेची गर्जना बनले आहे. या नाट्यसंस्थेने, जातीयवादावरील “दूर से किसी ने आवाज दी”, बालमजुरीवरील “मेरा बचपन”, कौटुंबिक हिंसाचारावरील “द्वंद्व”, आपले अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज असलेले “मैं औरत हूँ”, लिंग निवडीच्या विषयावरील “लाडली”, जैविक आणि भौगोलिक विविधतेवरील “बी-७”, मानव आणि निसर्गाच्या नैसर्गिक संसाधनांच्या खाजगीकरणाविरोधातील “ड्रॉप बाय ड्रॉप: वॉटर”, माणसाला माणूस म्हणून टिकवून ठेवण्यासाठी “गर्भ”, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीच्या विनाशावरील “किसानों का संघर्ष”, कलाकारांना कठपुतळी बनवणाऱ्या या आर्थिक व्यवस्थेतून त्यांच्या मुक्तीसाठी “अनहद नाद – अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स” समाजात राजकीय जाणीव जागृत करण्यासाठी “राजगती” यांसारख्या नाटकांच्या माध्यमातून जीवनाला नाटकाशी सातत्याने जोडत आहे. कला नेहमीच बदलाला चालना देते. कारण कला माणसाला माणूस बनवते. बनवलं पाहिजे.
मंजुलची नाटकं पाहणं म्हणजे दोन तीन दिवस त्याच गुंगीत विहरत राहणं. तरंगणं. छोट्याशा टबात काही लोक आंघोळ करतात. त्याच पाण्यात बसून परत स्नान घेतात. परत तेच. कलाक्षेत्र असं चिखल-टबासारखं होतं तेव्हा वाढ न होता रिवर्स गियर पडतं. नाटकांची कॉपी मारणे, अधिकाऱ्यांच्या साथीने बक्षिसासाठी लांच देणे या गोष्टी कला अकादमी रोखू शकत नाही. साचलेलं चिखल मैदान व स्वच्छ पाण्याची नदी यात फरक आहे. हा फरक जाणण्याची समज नसणे ही एक शिक्षा व कला क्षेत्राचं अपार नुकसान. मंजुल हा नाट्य क्षेत्रातील एक गोड निर्झर. नदीत खोल डुंबायचं असेल तर त्याला कवटाळायला हवा.

