सकाळ ( १४ डिसेंबर २०२५ )
'वृक्ष वाचवा'चा संदेश देणारे 'द अदर वर्ल्ड'
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांतची प्रस्तुती; नाटकाद्वारे पर्यावरणाबाबत जनजागृती
नाशिक, ता. १३ : पंचतत्त्वांच्या उत्पत्तीपासून सजीवसृष्टी आणि मानवनिर्मितीचा चाललेला अखंड प्रवास... हिमयुग-अश्मयुग ओलांडत मानवाने शेती आणि पशुपालनाच्या दिशेने केलेली वाटचाल... प्रवासात त्याने लावलेला अग्नीचा शोध... साधनांची निर्मिती, पाण्याचे नियोजन, बीज साठवण, निवाऱ्याची उभारणी आणि सहजीवनाची संगती, अशी आत्मसात केलेली अनेक मूलभूत कौशल्ये आणि हे सर्व निसर्गाशी सुसंगत करणे याचे प्रतिबिंब म्हणजे 'द अदर वर्ल्ड' नाटक.
थिएटर ऑफ रेलेवन्स
नाट्यसिद्धांत प्रस्तुत 'द अदर वर्ल्ड' हे । नाटक शुक्रवारी (ता. १२) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सादर करण्यात आले. पृथ्वी, पर्यावरण आणि मानवतेचे रक्षण, संवर्धन करण्याचा वसा घेतलेल्यांच्या जाणिवा मांडणारे हे नाटक होते. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला वेग दिला आणि त्यातून भांडवलशाही, साम्यवाद अशा व्यवस्थांचा उदय झाला. तथाकथित 'विकासा'च्या या वाटा पर्यावरण, पर्यावरणशास्त्र (इकॉलॉजी) आणि हवामानाच्या संतुलनाला बाधा पोहोचवू लागल्या. त्यामुळे आज मनुष्य मानवी नाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे, हे नाटकातून मांडण्यात आले. पात्रांच्या माध्यमातून उभी करण्यात आलेली झाडे, वन्यपशू, झाडांखाली वावरण्याचा अभिनय, प्राण्यांचा हिंस्त्रपणा हे सारे वाखाणण्याजोगे होते.
नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, तनिष्का लोंढे, नृपाली जोशी, प्रांजल गायकवाड आणि आरोही बाविस्कर यांनी भूमिका केल्या. लेखन व दिग्दर्शन मंजूल भारद्वाज यांचे होते. हे नाटक कोणतेही अनुदान, देणगी किंवा स्पॉन्सरशिप न घेता, निर्मात्याशिवाय केवळ प्रेक्षकांच्या सहभागाने नाटक प्रस्तुत करण्यात आले, हे विशेष!

No comments:
Post a Comment