जळत्या वेदनांची दाहकता ! - संजय डहाळे
" छावणी "
लेखन - प्रेमानंद गज्वी
दिग्दर्शन - मंजुल भारद्वाज
प्रकाश - संकेत आवळे
निर्मिती - बोधी नाट्य परिषद
थियेटर ऑफ रेलेव्हन्स
प्रयोग सहाय्य - शिवाजी मंदिर ट्रस्ट
काही नाटके इतिहास घडवितात. ज्याची दखल घेतल्याखेरीज रंगभूमीचा इतिहास पूर्ण होणार नाही. त्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे 'छावणी' हे नाट्य एका वळणावरलं ठरलंय. वैचारिक नाटकांच्या दालनात याने 'पुढलं पाऊल'च जसं टाकलंय. १९८० पासून गज्वी यांची रंगभूमीवर दहा-बारा नाटके आली पण 'छावणी' नाटक रंगभूमीवर येण्यासाठी २०१५ ते २०२२ अशी चक्क आठ वर्षाची प्रतीक्षा 'सेन्सॉरच्या अडथळ्यामुळे करावी लागली. योगायोग म्हणजे गज्वी यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात एकाच नाट्यगृहात तीन प्रयोग 'छावणी'चे केल्यामुळे दिग्दर्शक, रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी गज्वींना ही त्यांच्याच नाटकाची अनोखी अशी वाढदिवस भेट दिली आहे. एकूण आठ प्रवेशातलं हे नाट्य. दीर्घांक किंवा दोन अंकातही फिट्ट बसणारे. नक्षलवाद्यांच्या छावणीतला क्षणाक्षणी घडणारा थरार. त्यात त्यांचा म्होरक्या एम. एस. अर्थात मार्क्समाओ. त्याचे वडील चारूडांगे. ते कॉम्रेड. जे पोलिसांच्या एका चकमकीत ठार झालेत. त्यांचा वारसा पुढे एम. एस. चालवितो. दिल्लीपर्यंत सत्ता काबीज करण्याचं कॉ. डांगे यांचं स्वप्न होतं. एक लढाई जी गाव, जंगल ताब्यात घेण्यासाठी, गरीबी दूर करण्यासाठी, समतेसाठीची! हा हेतू या गटाच्या मनात पक्का रुजला आहे. तसेच जातीव्यवस्थेचा अंत करण्याचाही यांचा मजबूत इरादा आहे. छावणीतलं जगणं हे एका क्रांतीसाठी तसेच बदलासाठी आवश्यक असून त्यात व त्याभोवती अनेक उपकथानके पुढे येतात. सानंद मेजर गणेश गांगल, विधी आणि शंकराचार्यही ! शंकराचार्यांना बखोटं धरून फरफटत दहा लाखाच्या देणगीचं फसवं वचन देऊन 'छावणी'त हजर केलं जातं. त्यांना जातीधर्माबद्दल अनेक जाब-जवाब विचारले जातात. त्यातून एक वैचारिक मंथन पुढे येते. यात विधी आणि सानंद यांचेही एक कथानक खुबीने गुंफले आहे ते जात-पात विरहित प्रेमप्रकरणच; एकूणच 'छावणी'तल्या थरारामागे जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, देशाच्या सीमारेषा यावरले विविध कंगोरे उभे करण्यात आलेत. ज्यामागलं नाट्य म्हणून प्रसंग किंवा घटना शिल्लक न राहाता एक विचारमंथनच ठरते. ज्याची व्याप्ती आभाळाएवढी. या नाट्याचं कथानक एका प्रकरणात संपणारे नाही. जे गावापासून ते दिल्लीपर्यंत आणि देशापासून जगापर्यंत सफाईदारपणे गुंफले आहे. नाट्याचा शेवट असा आहे की शंकराचार्यांना तसेच भांडवलदारांना ताब्यात घेऊन कोंडून ठेवले आहे. अखेर यावर रसिकांनीच निर्णय द्यावा असं अभिप्रेत आहे. .
ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही नष्ट व्हायलाच हवी, अशी अपेक्षा खूपकाही सांगून जाते. विचार करायला प्रवृत्त करते. नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी एका महाकादंबरीचा विषय हा या छोटेखानी नाट्यात ताकदीने बसविला आहे. त्यात कुठेही विस्कळीतपणा किंवा कृत्रिमता नाही. व्यक्तिरेखांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीच्या माध्यमातून त्यामागलं वैचारिक नाट्य समर्थपणे आकाराला येते.
संहितेला प्रत्येक प्रसंग हा हादरून सोडतो. त्याला वेग आणि अर्थ आहे. तळागाळातली माणसं आणि त्यांच्यावर लादलेला व्यवस्थेचा संघर्ष हा यातून सुन्न करून सोडतो. आता सादरीकरणाबद्दल. हे नाट्य रंगमंचावर सादर करणे तसे कठीण. कारण त्यातील संवाद त्याचा अर्थ, त्यातील बारकावे हे रसिकापर्यंत पोहचणे ही पहिली परीक्षा आणि ती मंजूल भारद्वाज यांनी पुरेपूर ओळखून तांत्रिक अंगाला महत्त्व न देता नाट्य उभं केलंय. प्रत्येक प्रसंग हा वेगवान असल्याने गुंतवून ठेवतो. दिग्दर्शक भारद्वाज यांच्या वैचारिक भूमिकेशी हे नाट्य जवळचे असल्याने त्यांनीही त्यात बाजी मारली आहे. अश्विनी नांदेडकर यांचा एम. एम; सायली पावसकर यांचा गणी गांगल. कोमल खामकर (स्वानंदी), तुषार मस्के (विधान), प्रियांका कांबळे (शंकराचार्य), सुरेखा साळुंखे (व्यंजन), प्रांजल गुडीले, सुशांत पवार, तनिष्का लोंढे (कमांडो) ही रंगकर्मींची टिम पूर्ण तयारीची आहे. प्रत्येकाने भूमिका पेलली आहे. विशेष म्हणजे, सारे रंगकर्मी हे नाट्य कार्यशाळेतून एक समज घेऊन बाहेर पडले असल्याने अविष्कारात चमक दिसतेय. गज्वी यांचे 'छावणी' नाट्य म्हणजे प्रबंधाचा विषय आहे. डॉ. अशोक बाबर या नाट्यसंहितेबद्दल म्हणतात, 'भारतीय साहित्याचा, नाटकाचा आशय काय असावा आणि तो कसा असावा याचे 'छावणी' हे नाटक मॉडेल म्हणून पाहण्यासारखे आहे. वास्तविक हे नाटक पाहण्यापेक्षा वाचणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण या नाट्यसंहितेत सूक्ष्म बारकावे वाचतांना गज्वींच्या सखोल चिंतनाचा प्रत्यय येतो. 'छावणी चे आशयद्रव्य हे नाटकापेक्षा आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या तोडीचा आहे! हे पुरेपूर पटते. विषयाचे कौतुक, चर्चा, परिसंवाद करण्यापेक्षा अशा वेगळ्या वळणाची नाटके रंगभूमीवर येणे काळाची गरज आहे.
'थिएटर ऑफ रिलेव्हन्स' हा रंगसिद्धांत गेली तीसएक वर्षे निष्ठेने आपल्या प्रयोगातून साकार करणारे मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनातून हा प्रयोग रंगभूमीवर आलाय. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत या तांत्रिक बाजूंवर अवलंबून न राहाता संहिता मजबुतीने साकार करण्यावर त्यांची सारी भिस्त आहे. निव्वळ धंदेवाईक असणाऱ्या नाटकांना छेद देण्याचा 'प्रयोग' त्यामागे आहे. कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता शब्द आणि त्यामागला अर्थ, त्याचे परिणाम या घटकांना दिग्दर्शक भारद्वाज यांनी महत्व दिले आहे. वास्तवातील भीषण सत्य मांडण्याचा हा प्रयत्न रसिकांना अंतर्मुख करतो. त्यातील बंडखोरी हादरून सोडते. अशा विषयांच्या नाटकांना व्यावसायिक रंगभूमीची दारे ही उघडली गेली पाहिजेत, कारण ही वैचारिक लढाई आहे. फक्त अभ्यासापुरती अशी नाटके मर्यादित राहाता कामा नयेत. ती रसिकांपर्यंत पोहचली पाहिजेत. भले अभिवाचनाच्या स्वरूपात जरी सादर केली तरीही. ही अपेक्षा. नाटकाची संहिता आणि रंगमंचावरला प्रयोग यातील म्होरकेपणाचा हा वाद त्यामागील साहित्य आणि आविष्कार यावर अवलंबून असतो. संहितेखेरीज प्रयोग होणं शक्य नाही. नाट्य ही स्वतंत्र कला जरी असली तरी त्यात अनेक कलांचे मिश्रण स्वाभाविकच असते. 'छावणी'त दोन्हीकडे वेगळेपणा नजरेत भरतो. आजकालच्या व्यावसायिक रंजनमनोरंजन रंगभूमीकडून चिंतनात्मक रंगभूमीकडे घेऊन जाणारे हे नाट्य. ज्याची दखल ही जागतिक रंगभूमीवर निश्चितच घेतली जाईल, यात शंका नाही. कारण यात समाज जीवनातील जळत्या वेदनांची दाहकता ही शब्दाशब्दात गच्च भरलेली आहे.
sanjaydahale33@gmail.com

No comments:
Post a Comment